नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार एनडीएची बैठक

बिहारमध्ये, एनडीएने बुधवारी (19 नोव्हेंबर) नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड केली आणि त्यांचा दहाव्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. नितीश कुमार बुधवारी संध्याकाळी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

एनडीएची ही महत्त्वाची बैठक राज्य विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली, ज्यामध्ये आघाडीतील पाच पक्षांचे आमदार आणि प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्याकडेच राहणार असल्याचे निश्चित झाले.

बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी पाच मित्रपक्षांचे आमदार मिळून मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतील, असे संकेत दिले होते. ते म्हणाले, “सर्व पक्ष बैठकीला उपस्थित राहतील आणि तेथे निर्णय घेतला जाईल. आमची इच्छा आहे की नितीश कुमार यांनी उपस्थित रहावे, परंतु निर्णय बैठकीतच घेतला जाईल.”

नितीश कुमार गुरुवारी (20 नोव्हेंबर) पाटणा येथील गांधी मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच समारंभात भाजपचे ज्येष्ठ नेते विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि संसदेच्या ज्येष्ठ सदस्यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. गांधी मैदानावर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यातून बिहारच्या राजकारणात नितीशकुमार यांची मध्यवर्ती भूमिका पुन्हा एकदा दिसून येते.

हे देखील वाचा:

कोलंबो सुरक्षा परिषदेची बैठक 20 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार असून, अजित डोवाल होस्ट करणार आहेत

“लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलापर्यंत आम्ही भारतावर हल्ला केला”, पाकिस्तानी नेत्याची खळबळजनक कबुली

दिल्ली लाल किल्ला स्फोटातील तुर्की लिंकचा तपास तीव्र; इस्तंबूल इंटरनॅशनल प्रिंटिंग प्रेसवर एटीएसचा छापा!

Comments are closed.