125 BRO प्रकल्प राष्ट्राला समर्पित
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती : मजबूत पायाभूत सुविधांमुळे कनेक्टिव्हिटी सुधारणार
वृत्तसंस्था/ लेह
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लडाखमध्ये 125 बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन्स (बीआरओ – सीमा रस्ते संघटना) पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. सीमा पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने बीआरओ आणि केंद्र सरकारने टाकलेले एक मोठे पाऊल असल्याचे सुतोवाच या प्रकल्पांच्या राष्ट्रार्पणप्रसंगी संरक्षणमंत्र्यांनी केले. या माध्यमातून सुसज्ज रस्ते, रिअल-टाइम कम्युनिकेशन, उपग्रह समर्थन, देखरेख नेटवर्क आणि लॉजिस्टिक्स सपोर्टमुळे आपले सैनिक देशाच्या सीमेवर मजबूतपणे उभे राहण्यास सक्षम झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी लडाखमधील दरबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रस्त्यावरील 920 मीटर लांबीचा श्योक बोगदा, गलवान स्मारक आणि काश्मीर, राजस्थान, चंदीगड आणि इतर राज्यांमधील प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. सुमारे 5,000 कोटी रुपये खर्चून 28 रस्ते, 93 पूल आणि इतर चार प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या सुधारित पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे दुर्गम गावे आणि लष्करी ठिकाणांशी शेवटच्या मैलापर्यंतची कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारल्यामुळे हे भाग राष्ट्रीय मुख्य प्रवाहाच्या जवळ येतील. तसेच लष्करी हालचाली, रसद वाहतूक, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी सुलभ होतील. हे प्रकल्प देशासाठी अथक परिश्रम करणाऱ्या बीआरओ कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून सैन्यातील शूर सैनिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत. यापूर्वी कधीही इतक्या बीआरओ प्रकल्पांचे एकाचवेळी उद्घाटन झाले नव्हते, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनानुसार सीमा पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृढ संकल्पाचे पुरावे असल्याचे वर्णन केले.
श्योक बोगदा हा अभियांत्रिकीतील चमत्कार
श्योक बोगद्याची निर्मिती हा अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे. यामुळे या भागात सर्व हवामानात विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल आणि कडक हिवाळ्यात जलद तैनातीची क्षमता वाढेल, असेही संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज आम्ही लडाखमधील दरबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रस्त्यावर 920 मीटर लांबीच्या श्योक बोगद्याचे उद्घाटन करत आहोत. जगातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक भूभागांपैकी एकावर बांधलेले अभियांत्रिकीचे हे अद्वितीय उदाहरण आहे. आता येथे सर्व हंगामांमध्ये कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल, असेही संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले. आत्मनिर्भर यंत्रणांद्वारे कठीण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून बीआरओने आपली ताकद दाखवून दिल्याचेही ते पुढे म्हणाले.
देशाच्या वेगवेगळ्या भागात साकारले प्रकल्प
लडाख व्यतिरिक्त जम्मू काश्मीर, चंदीगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये उभारण्यात आलेले इतर बीआरओ प्रकल्पही याप्रसंगी राष्ट्राला समर्पित करण्यात आले. गेल्या काही वर्षांत सीमावर्ती भागात बीआरओने प्रचंड वेगाने आणि कार्यक्षमतेने पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. या प्रकल्पांमुळे देशाच्या विकासाला लक्षणीयरीत्या चालना मिळणार आहे.
याप्रसंगी संरक्षणमंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’संबंधीही भाष्य केले. पाकिस्तानला इशारा देताना ‘आम्ही बरेच काही करू शकलो असतो. परंतु आमच्या सैन्याने धैर्य आणि संयम दाखवला. आम्ही जे आवश्यक होते तेच केले’, असे ते म्हणाले. आमच्या मजबूत कनेक्टिव्हिटीमुळे इतके मोठी मोहीम शक्य झाली. सैन्याने मोहीम पार पाडण्यासाठी वेळेत त्यांची उपकरणे पोहोचवली. या कामगिरीत बीआरओचे योगदानही न विसरण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन वर्षात 356 बीआरओ पायाभूत प्रकल्पांची उभारणी
गेल्या दोन वर्षात एकूण 356 बीआरओ पायाभूत सुविधा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहेत. हे धोरणात्मक पायाभूत सुविधा विकासाच्या क्षेत्रातील एक मोठे यश आहे. अशा विविध आणि कठीण प्रदेशात हे प्रकल्प पूर्ण करणे ही बीआरओसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासातील त्यांची महत्त्वाची भूमिका ओळखून सरकारने 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात बीआरओचे बजेट 6,500 कोटींवरून 7,146 कोटींपर्यंत वाढवले आहे.
Comments are closed.