बिहारमध्ये 125 विजेची युनिट्स
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतला निर्णय
वृत्तसंस्था/पाटणा
बिहारच्या राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक घराला 125 युनिटस् वीज विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऑगस्ट 2025 पासून, अर्थात, पुढच्या महिन्यापासूनच लागू केला जाणार आहे. या निर्णयाचा लाभ गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गिय कुटुंबांना होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या निर्णयाची घोषणा ‘एक्स’ या माध्यमावरुन संदेश प्रसारित करुन गुरुवारी केली आहे. 1 ऑगस्ट पासूनच हा निर्णय लागू होणार असल्याने पात्र कुटुंबांना जुलैचही वीजबिल शून्य इतके येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेचा लाभ राज्यातल्या 1 कोटी 67 लाख कुटुंबांना, अर्थात जवळपास 90 टक्के बिहारी जनतेला होण्याची शक्यता आहे.
सौरऊर्जाही पुरविणार
बिहार सरकारने सौरऊर्जेच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एका व्यापक योजनेचीही घोषणा केली आहे. बिहारमधील कुटुंबांच्या इच्छेनुसार त्यांच्या घरांच्या छपरांवर किंवा जवळपासच्या सरकारी भूमीत सौरऊजा निर्मिती संच बसविण्यात येणार आहे. हे संच सदर कुटुंबांची अनुमती घेऊनच बसविण्यात येणार आहेत. तसेच जी कुटुंबे अत्यंत गरीब स्थितीत आहेत, त्यांना राज्यसरकार स्वखर्चाने असे सौरऊर्जा संच बसवून देणार आहे. गरीबांसाठीची ही योजना ‘कुटीर ज्योती’ योजना म्हणून ओळखली जाणार आहे, अशी माहितीही नितीश कुमार यांनी दिली आहे.
10 हजार मेगावॅट शक्य
बिहारमध्ये पुढच्या तीन वर्षांमध्ये सौर वीजेचे उत्पादन 3 हजार मेगावॅट इतके करण्याची राज्य सरकारची योजना आहे. सौर वीज निर्मितीसाठी प्रारंभी गुंतवणूक अधिक करावी लागणार असली, तरी नंतर ही ऊर्जा जवळपास विनामूल्य मिळू शकते. त्यामुळे सौर वीजेच्या उत्पादनाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
योजनांचा वर्षाव
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून विविध योजनांच्या घोषणांचा वर्षाव करण्यास प्रारंभ केला आहे. वृद्ध आणि दिव्यांग लोकांसाठीच्या सानुग्रह सुरक्षा निधीचे प्रमाण प्रतिमहिना 400 रुपयांवरुन 1,100 रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच बिहारमध्ये पुढच्या पाच वर्षांमध्ये, अर्थात 2025 ते 2030 या काळात एक कोटी नवे रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत. लवकरच राज्यात 1 लाख नव्या शिक्षकांची भर्ती करण्यासाठी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या योजनांनंतर आता विनामूल्य वीजेची घोषणा करण्यात आली आहे. बिहारमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक आहे.
विरोधी पक्षांची टीका
नितीश कुमार यांच्या घोषणांवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते शक्तीसिंग यादव यांनी या घोषणांना अर्थ नसल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रीय जनता दलाने 200 युनिटस् वीज विनामूल्य देण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले आहे. त्या दबावाखाली नितीश कुमार यांनी 125 युनिटस् वीजेचे आश्वासन दिल्याचा आरोप त्यांनी केला. जनता नितीश कुमार यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असा दावाही राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आला आहे.
Comments are closed.