मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार-रविवार मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द

मध्य रेल्वे मार्गावर 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सीएसएमटी येथे विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 लांबीकरणासाठी 28 फेब्रुवारी (शुक्रवार) मध्यरात्री ते 2 मार्च (रविवार) दरम्यान विशेष ब्लॉक लागू केला आहे. या फलाटांची लांबी वाढवल्याने 18 कोच गाड्यांऐवजी 24 कोच गाड्यांसाठी थांबा तयार होणार आहे. ब्लॉक कालवधीत सीएसएमटी-भायखळा दरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत.हार्बर मार्गावर सर्व सेवा वडाळापर्यंत चालवण्यात येतील. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावर अनेक लांब पल्लाच्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत. तर अनेक उपनगरी सेवा रद्द करण्यात आल्या आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान गर्डर कामासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत असा 13 तासांचा मोठा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक काळात पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळील गर्डर उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. चर्चगेट लोकलचा प्रवास वांद्रे आणि दादर स्थानकांत समाप्त होईल. काही लोकल गाडय़ा वांद्रे व दादर स्थानकांतून विरार व बोरिवलीच्या परतीच्या प्रवासासाठी चालवण्यात येणार आहेत.

Comments are closed.