Asian Games 2026: वय अवघं 13, पराक्रम सुवर्णपदकाचा; थक्क करणारी कामगिरी

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games) मध्ये एका 13 वर्षाच्या मुलीने इतिहास रचला आहे. पुढील महिन्यात 14 वर्षांची होणाऱ्या चिनी जलतरणपटू (स्विमर) यु झिदी हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

झिदीने महिलांच्या 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 2 मिनिटे 05.08 सेकंदांच्या आशियाई खेळांतील विक्रमी वेळेसह सुवर्णपदक जिंकले आहे. ऑलिम्पिक 2028 च्या केवळ दोन वर्षे आधी, तिच्या कारकिर्दीतील हे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.

ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर झिदीने हसतमुखाने सांगितले की, तिची कामगिरी ठीकठाक होती.

चीनचे वर्चस्व
झिदीने गेल्या वर्षी वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी रिलेमध्ये कांस्य पदक जिंकून जागतिक जलतरण स्पर्धेच्या इतिहासात सर्वात युवा पदक विजेता होण्याचा मान मिळवला होता. सुरू असलेल्या स्पर्धेत सध्या चीनी जलतरणपटूंचेच वर्चस्व दिसत आहे. त्यांनी पहिल्या दिवशी सातपैकी सहा सुवर्ण पदके जिंकली आहेत.

झिदीने सुवर्ण कामगिरी करताना स्वत:च्याच देशाच्या चांग मोहनला तब्बल 3.36 सेकंदांनी मागे टाकले. त्यामुळे मोहनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

झिदी या स्पर्धेत तीन वैयक्तिक स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. तिने आपल्या पहिल्याच आशियाई स्पर्धेत सहभागी होत सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे.

झिदीचा विश्वविक्रम आणि ऑलिम्पिक अपेक्षा
झिदीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तिने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी जागतिक जलतरण स्पर्धेत चीनच्या 4X200 मीटर फ्रीस्टाईल रिले संघासोबत कांस्य पदक जिंकत इतिहास रचला होता. ती त्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा पदक विजेती ठरली होती. तसेच तिने तीन वैयक्तिक स्पर्धांमध्ये चौथे स्थान पटकावले होते.

त्याचबरोबर झिदीने या वर्षीच्या मार्च महिन्यात अमेरिकेच्या ऑलिम्पिक चॅम्पियन रेगन स्मिथला पराभूत करत सर्वांना चकित केले होते. तिची ही सातत्यपूर्ण कामगिरी पाहून ती 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक पदकासाठी प्रमुख दावेदार म्हणून समोर आली आहे.

एवढ्या कमी वयात पदकविजेती कामगिरी करताना युवा खेळाडूच्या मानसिक आणि शारीरिक दबावाबाबत चर्चा सुरू झाली. जागतिक जलक्रीडा नियमांनुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी किमान वय 14 वर्षे असले तरी, पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या लहान जलतरणपटूंसाठी हे वय शिथिल केले जाते. यामुळेच झिदीला या स्पर्धेत सहभागी होता आले आहे. (13 year old Yu Zidi breaks Asian Games record to win GOLD in Women’s swimming 2026)

Comments are closed.