131 कोटींचे बक्षीस जाहीर, पण टॅक्स कापून प्रत्येक खेळाडूच्या हातात नेमके किती कोटी येणार?

अवघ्या काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा९७ धावांनी पराभव करत एकूण तिसरे आणि सलग दुसरे विश्वविजेतेपद जिंकले. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने आपल्या खेळाडूंसाठी १३१ कोटी रुपयांच्या भरघोस बक्षिसाची घोषणा केली आहे.

मैदानावरील विजयाचा आनंद आपण साजरा केलाच, पण आता या बक्षिसाच्या रकमेवर सरकारला किती कर मिळेल, हे पाहणे सुद्धा रंजक ठरणार आहे. याबाबत लोकसत्ताशी बोलताना सीए अनिरुद्ध सुरेश राठी यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

“एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून जेव्हा मी या आकड्यांकडे पाहतो, तेव्हा मला त्यात विजयासोबतच देशाच्या तिजोरीत जमा होणारा मोठा महसूलही दिसतो”, असे सीए अनिरुद्ध राठी लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या या १३१ कोटींच्या बक्षिसातून संघातील १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ ते ६ कोटी रुपये मिळतील. प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ५ कोटी, तर इतर सपोर्ट स्टाफ आणि राखीव खेळाडूंनाही १ ते २ कोटी रुपये मिळतील.

भारतात अशा प्रकारच्या बक्षीस रकमेवर इन्कम टॅक्सच्या ‘अदर सोर्सेस’ (Other Sources) अंतर्गत कर आकारला जातो. खेळाडू हे सर्वाधिक टॅक्स स्लॅबमध्ये (३०%) येत असल्यामुळे या रकमेवर थेट ३०% आयकर लागेल.

केवळ ३०% करावर हे थांबत नाही. बहुतांश खेळाडूंचे उत्पन्न ५ कोटींच्या वर असल्यामुळे त्यावर २५% किंवा ३७% (नवीन/जुनी प्रणालीनुसार) अधिभार आणि ४% उपकर लागतो.

समजा एका खेळाडूला ५ कोटी रुपये मिळाले, तर साधारणपणे ४२% ते ४५% रक्कम करामध्ये जाऊ शकते. म्हणजे ५ कोटींमधील जवळपास २.१५ ते २.२५ कोटी रुपये सरकारला कर म्हणून मिळतील आणि खेळाडूच्या हातात साधारण २.७५ ते २.८५ कोटी रुपये येतील.

बीसीसीआय जेव्हा १३१ कोटी बक्षिस जाहीर करते, तेव्हा त्यातील जवळपास ५५ ते ६० कोटी रुपये कराच्या रूपाने केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होतील. म्हणजेच खेळाडूंनी केवळ विश्वचषकच जिंकला नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही मोलाचा हातभार लावला आहे. त्यामुळे हे बक्षिस आणि टॅक्सचा ‘गुगली’ हे दोन्ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी आहे.

Comments are closed.