मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत-धावत साजरा करणार वाढदिवस

मुंबई मॅरेथॉन 2026 ही केवळ धावण्याची स्पर्धा न राहता यंदा आयुष्याच्या उत्सवाचाही साक्षीदार ठरणार आहे. येत्या रविवारी मुंबईच्या रस्त्यांवर उतरणाऱया 69 हजारांहून अधिक धावपटूंमध्ये 135 धावपटू धावत-धावत आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.

यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूंनी केक, मेणबत्त्या आणि पार्टीऐवजी घाम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर आयुष्याचा नवा वर्षप्रवेश करण्याचा मार्ग निवडला आहे. या धावपटूंसाठी ही स्पर्धा केवळ शर्यत नसून फिटनेस, समर्पण आणि वैयक्तिक आनंद यांचा संगम असलेला एक खास क्षण ठरणार आहे. यंदा मॅरेथॉन आतापर्यंत 69,100 सहभागी निश्चित झाले असून, प्रत्येक धावपटू आपल्यासोबत एक वेगळी कथा घेऊन धावताना दिसणार आहे.

15 वर्षांपेक्षा जास्त काळ मॅरेथॉन धावणारे 22 धावपटू

मुंबई मॅरेथॉन 2026 मध्ये काही धावपटू गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सहभागी होत आहेत. 22 धावपटू असे आहेत, जे 15 वर्षांहून अधिक काळ फुल मॅरेथॉन धावत आहेत. सहा धावपटू 15 वर्षे, 10 धावपटू 16 वर्षे, 2 धावपटू 17 वर्षे, तर 4 धावपटू 19 वर्षांपासून मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत.

Comments are closed.