वसई-विरारच्या रस्त्यांवर धावणार वेगाचे वादळ; सर्वेश कुशारेच्या उपस्थितीत 13 वी महापौर मॅरेथॉन सज्ज
देशातील आघाडीच्या मॅरेथॉनमध्ये गणल्या जाणाऱया वसई-विरार महापौर मॅरेथॉनचा धावता थरार यंदा अधिक रंगतदार होणार आहे. आशियाई आणि राष्ट्रपुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता उंच उडीपटू सर्वेश कुशारे स्पर्धेचा इव्हेंट अॅम्बेसेडर असणार असून 13 डिसेंबरला होणाऱ्या 13 व्या आवृत्तीत नऊ हजारांहून अधिक वेगवान धावपटू आणि पाच हजारांहून अधिक ज्युनियर स्पर्धक सहभागी होतील. तब्बल 58 लाख रुपयांची बक्षीस रक्कम हे यंदाचे प्रमुख आकर्षण आहे
वसई-विरार महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किमी, 5 किमी आणि धमाल धाव अशा विविध प्रकारांत स्पर्धकांना आपले काwशल्य दाखवता येणार आहे. बॅटल रनचाही समावेश करण्यात आला आहे. पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये 14 एलिट धावपटूंची फौज उतरणार आहे. 2023 चा विजेता तीर्थ पुमार पुन (2ः17.15) आणि या मार्गावरील 2ः18.05 विक्रमाचा धनी मोहित राठोर यांच्यात विशेष चुरस अपेक्षित आहे. पूर्ण मॅरेथॉन विजेत्याला तीन लाख, तर हाफ मॅरेथॉन विजेत्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार आहेत. स्थानिक धावपटूंसाठी स्वतंत्र बक्षीस निधीही वाढवण्यात आला आहे.
सर्वेश कुशारेने 2026 मध्ये 2.31 मीटर उडीसह राष्ट्रीय विक्रम केला. डायमंड लीगमध्ये पदक मिळवणारा तो पहिला हिंदुस्थानी उंच उडीपटू ठरला आहे. त्याची उपस्थिती तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
पश्चिम रेल्वे चर्चगेट-विरारदरम्यान पहाटे दोन विशेष गाडय़ा चालवणार आहे. पूर्ण मॅरेथॉन पहाटे 5.30, हाफ मॅरेथॉन सकाळी 6, तर 10 किमी धाव 5.45 आणि 5 किमी धाव 6 वाजता सुरू होईल. ‘अमली पदार्थांना नकार’ आणि ‘पाणी वाचवा’ हे सामाजिक संदेशही या स्पर्धेतून दिले जाणार आहेत.
Comments are closed.