14 लोकांना बिटकॉइन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली
गुजरातमधील प्रकरण : भाजपच्या माजी आमदारासह आयपीएस अधिकारी आरोपी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमधील बहुचर्चित बिटकॉइन घोटाळ्यात एक महत्त्वाचा निकाल देताना, विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) न्यायालयाने शुक्रवारी माजी आमदार नलिन कोटाडिया, अमरेलीचे माजी पोलीस अधीक्षक जगदीश पटेल आणि माजी पोलीस निरीक्षक अनंत पटेल यांच्यासह 14 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नोटाबंदीनंतर हे प्रकरण बरेच चर्चेत आले होते. 2018 मध्ये उघडकीस आलेल्या 12 कोटी रुपये किमतीच्या 176 बिटकॉइनच्या खंडणी आणि अपहरणाच्या कटात सर्व आरोपी सहभागी असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.
2018 च्या बिटकॉइन दरोडा आणि अपहरण प्रकरणात अहमदाबाद शहर सत्र न्यायालयाच्या एसीबी न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. 2018 मध्ये अमरेली जिह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला अज्ञात ठिकाणी ओलीस ठेवले होते, असा आरोप सुरतमधील रहिवासी बिल्डर शैलेश भट्ट यांनी केला होता. चौकशीदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना धमकावत 12 कोटी रुपयांचे बिटकॉइन आपल्या खात्यात ट्रान्सफर केले होते. या कटात भाजपचे माजी आमदार नलिन कोटडिया यांचाही सहभाग होता. नंतर शैलेश भट्ट यांनी त्यांचा साथीदार किरीट पलाडिया यांच्यावर पोलिसांशी संगनमत असल्याचा आरोपही केला. याप्रकरणी सीआयडीच्या तपासात किरीट पलाडिया यांनीच हा संपूर्ण कट रचल्याचे सिद्ध झाले होते.
गुजरात सरकारने या हाय-प्रोफाईल प्रकरणाचा तपास अहमदाबाद सीआयडीकडे सोपवला होता. 2018 मध्येच या प्रकरणात पोलीस अधीक्षकांसह अन्य पोलिसांना अटक करण्यात आली. शैलेश पलाडिया आणि पोलिसांच्या अटकेनंतर भाजप आमदार नलिन कोटडिया यांचाही या कटात सहभाग असल्याचे आढळून आले. माजी भाजप आमदार नलिन कोटडिया भूमिगत झाल्यानंतर त्यांना फरार घोषित करण्यात आले. जवळपास एका महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर 2018 मध्ये नलिन कोटडिया यांना महाराष्ट्रातील धुळे येथून अटक करण्यात आली होती. येथे ते त्यांच्या एका सहकाऱ्यासह सापडले होते.
Comments are closed.