ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुंबईत 142 डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यांची नोंद, नागरिकांची 114 कोटींची आर्थिक फसवणूक

नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढवत असतात. सध्या डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची प्रचंड फसवणूक सुरू आहे. मुंबईत चालू वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत डिजिटल अरेस्टचे 142 गुन्हे नोंदविण्यात आले असून नागरिकांची तब्बल 114 कोटी रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हे गुन्हे होऊ नये याकरिता मुंबई पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
सायबर गुन्हेगार पोलीस किंवा तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून तुम्हाला गुन्ह्यात अटक होईल अशी भीती दाखवत डिजिटल अटक करतात. मग त्याद्वारे अधिक घाबरवून संबंधितांकडून लाखो, करोडो रुपये ऑनलाईन उकळतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्त प्रमाणात टार्गेट केले जात असल्याचे समोर आले आहे. वृद्धापकाळात एका क्षणात आयुष्यभराचे कमावलेले पैसे जात असल्याने मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांमध्ये डिजिटल अटकेबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईतील परिमंडळ 1 अंतर्गत राहणाऱया 627 ज्येष्ठांना त्यांच्या घरी जाऊन पोलिसांनी डिजिटल अटकेबाबत माहिती देऊन त्यांना जागृत केले आहे.

Comments are closed.