15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पससाठी मंजुरी, पहिली तुकडी ऑगस्टमध्ये सुरू होणार
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारतात परदेशी विद्यापीठातून पदवी मिळवण्यासाठी आता परदेशात जाण्याची गरज भासणार नाही. केंद्र सरकारने भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना आधीच आशयपत्रे (एलओएल) जारी केली आहेत. यापैकी बहुतेक कॅम्पसमध्ये ऑगस्टमध्ये पहिली तुकडी सुरू होईल. सुरुवातीला प्रत्येक कॅम्पसमध्ये 200 ते 250 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
अॅबर्डीन विद्यापीठ, ब्रिस्टल, यॉर्क, इलिनॉय टेक, लिव्हरपूल आणि व्हिक्टोरिया विद्यापीठ यांसारख्या संस्था मुंबई, दिल्ली आणि बेंगळूर येथे कॅम्पस उघडत आहेत. चालू सत्रासाठी 10,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. परदेशी विद्यापीठांच्या भारतीय कॅम्पसमधील शिक्षण, परीक्षा, मूल्यांकन आणि पदव्या त्यांच्या मूळ कॅम्पसमधील जागतिक मानकांनुसार निश्चित केल्या जातील. सुरुवातीच्या टप्प्यात एआय, संगणक विज्ञान आणि ‘एसटीईएम’ विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
पुढील पाच वर्षांत ही संख्या दरवर्षी 1,000 ते 1,200 विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. अॅबर्डीन विद्यापीठ (मुंबई), ब्रिस्टल (मुंबई), लिव्हरपूल (बेंगळूर), यॉर्क (मुंबई), इलिनॉय टेक (मुंबई) आणि व्हिक्टोरिया विद्यापीठ (दिल्ली) असे कॅम्पस उघडले जाणार आहेत.
Comments are closed.