झारखंडमध्ये 15 नक्षलवादी ठार.

1 कोटी बक्षीस असलेल्या नक्षली कमांडरचा समावेश : सुरक्षा दलाला मोठे यश,सारंडा जंगलात शोध मोहिमेदरम्यान तुंबळ चकमक,पोलीस, कोब्रा बटालियन, केंद्रीय दलांचा सहभाग,अचूक माहितीच्या आधारे सुरक्षा दलाची कारवाई

वृत्तसंस्था/रांची

झारखंडमध्ये सुरक्षा दलांनी राबविलेल्या संयुक्त मोहिमेवेळी झालेल्या चकमकीत 15 हून अधिक नक्षलवादी ठार झाले. पश्चिम सिंहभूम जिह्यातील सारंडा जंगलात गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि सीपीआय-माओवादी नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. गुरुवारी पहाटे सुरू झालेली ही चकमक दिवसभर सुरू होती. सायंकाळी या चकमकीत 11 जण ठार झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली होती. मात्र, रात्री उशिराने हा आकडा 15 वर पोहोचल्याचे जाहीर करण्यात आले.

नक्षलवादविरोधी कारवाईचा भाग म्हणून गुरुवारी चैबासा जिह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षा दल आणि नक्षलवादी संघटनेमध्ये भीषण चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबद्दलच्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरू करत छोटानाग्राह पोलीस स्थानक हद्दीतील घनदाट आणि दुर्गम जंगलात मोहीम सुरू केली. या चकमकीत 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या अनलसह इतर दहा नक्षलवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले. चकमकीत मारल्या गेलेल्या इतर नक्षलवाद्यांमध्ये अनेक महत्त्वाचे कमांडर असल्याचे सांगितले जाते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्याच्या संकल्पाने पुढे जात असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.

वरिष्ठ सीआरपीएफ आणि झारखंड पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना सारंडा जंगलात नक्षलवादी हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर, कोब्रा बटालियन, झारखंड जग्वार्स आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाचे जवान नक्षली तळाच्या आसपास पोहोचताच नक्षलवाद्यांची घाबरगुंडी उडाली. सुरक्षा दलांनी आपल्याला घेरल्याचे समजताच नक्षलवाद्यांनी बचावासाठी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

सुरक्षा दलाची नियोजनबद्ध कामगिरी

सुरक्षा दलांनी ताबडतोब कारवाई करत चोख प्रत्युत्तर दिले. बराच वेळ जोरदार गोळीबार सुरू राहिल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षा दलांचा दबाव वाढत असताना काही नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेल्याचे वृत्त आहे. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून सखोल शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा संस्था या परिसरावर सतत लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही नक्षलवादी कारवायांना त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहे.

विरोधी पक्षाकडून पथकाचे अभिनंदन

विरोधी पक्षनेते बाबुलाल मरांडी यांनी चकमकीत अनल ठार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत कारवाईत सहभागी झालेल्या पथकाचे अभिनंदन केले. झारखंडमधील चैबासा येथील सारंडा जंगलात कोब्रा बटालियन, सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे 15 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. मृतांमध्ये 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलवादी कमांडरचा समावेश असणे हे रेड टेररविरुद्धचे मोठे यश आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या सर्व सैनिकांनी अदम्य धैर्य, शौर्य आणि समर्पण दाखवले, असे त्यांनी म्हटले आहे.

1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला अनल दा ठार

झारखंडमधील गिरिडीह जिह्यातील रहिवासी अनल दा वर्षानुवर्षे सारंडाच्या घनदाट जंगलात लपून बसला होता. तो सीपीआय-माओवादी गटाच्या झारखंड-बिहार स्पेशल एरिया कमिटीशी संबंधित होता. तो या संघटनेचे नेतृत्व करत होता. त्याच्या डोक्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस होते. अनल दा सारख्या वरिष्ठ कमांडरचा खात्मा करणे माओवादी संघटनेचा कणा मोडल्यासारखे मानले जात आहे. आता या चकमकीनंतर झारखंडमध्ये प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेले फक्त दोन नक्षलवादी उरले आहेत.

Comments are closed.