15 वर्षीय खेळाडूचा जागतिक धमाका; पदार्पणातच धुरळा उडवला, क्रिकेटच्या इतिहासातील दोन जागतिक विक्रम केले नाववर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रणांगणावर दररोज नवे विक्रम प्रस्थापित होत असतात, पण रवांडाच्या अवघ्या 15 वर्षीय फॅनी उटागुशिमानिंदे या खेळाडूने जे करून दाखवले आहे, त्याने संपूर्ण क्रिकेट विश्व अवाक झाले आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्याला अविस्मरणीय बनवण्याच्या जिद्दीने मैदानात उतरलेल्या फॅनीने बॅटने अशी काही आग ओकली की, क्रिकेटच्या इतिहासातील दोन मोठे जागतिक विक्रम तिच्या नावावर जमा झाले आहेत. महिला क्रिकेटच्या इतिहासात आजवर एकाही दिग्गज खेळाडूला जे जमले नाही, ते या चिमुरडीने आपल्या पहिल्याच डावात करून दाखवत इतिहासाच्या पानांवर आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे.
नायजेरिया इनविटेशनल महिला टी-20 स्पर्धेत घानाविरुद्धच्या सामन्यात फॅनीला पदार्पणाची संधी मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले. अवघ्या 15 वर्षे 223 दिवस वय असलेल्या फॅनीने 65 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीने 111 धावांची तुफानी खेळी साकारली. या शतकी खेळीच्या जोरावर रवांडाने 20 षटकांत 210 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे, पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात तरुण वयात शतक झळकावण्याचा मान आता फॅनीला मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम फ्रान्सच्या गुस्ताव मॅकॉनच्या (18 वर्षे 280 दिवस) नावावर होता, जो आता फॅनीने मोडीत काढला आहे.
15 वर्षीय फॅनी उटागुशिमानिंदेने घाना विरुद्ध 111 (65) च्या जोरावर पदार्पण केले.
✅ T20 मध्ये पदार्पण शतक झळकावणारी पहिली महिला
✅ सर्वात तरुण T20I शतकवीर (15 वर्षे आणि 223 दिवस)
एक तारा जन्माला येतो. भविष्य रवांडन आहे.#रवांडा क्रिकेट #RisingStar #T20I pic.twitter.com/H6AOloYRAy— रवांडा क्रिकेट असोसिएशन (@RwandaCricket) 20 मार्च 2026
फॅनी उटागुशिमानिंदे हिने केवळ वयाचाच विक्रम मोडला नाही, तर पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा नवा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला आहे. आंतरराष्ट्रीय महिला टी-20 मध्ये पदार्पणात शतक झळकावणारी ती जगातील पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रोल्टनच्या नावावर होता, जिने 2005 मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 96 धावा केल्या होत्या. तब्बल 19 वर्षांनंतर फॅनीने रोल्टनचा हा विक्रम मोडीत काढत महिला क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची नांदी दिली आहे. या कामगिरीमुळे फॅनीवर सध्या जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments are closed.