अतिवृष्टी भरपाईपोटी 150 कोटींची मदत लालफितीत; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत नाहीच

सांगली जिह्यात जुलैमधील पूर आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठासह दुष्काळी पट्टय़ातील बागायती आणि फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर, जत आणि पलूस तालुक्यांतील गावांतील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 149 कोटी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, सोमवारी सायंकाळीही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. मंगळवारपासून बँकांना दिवाळीच्या सुट्टय़ा असल्याने नुकसानभरपाई लालफितीत अडकल्याचे स्पष्ट झाले.

राज्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली होती. सांगली जिह्यात ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे वारणा आणि कोयना धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला होता. कृष्णा आणि वारणा नद्यांना मागील आठवडय़ात पूर आला. या पुराचे पाणी जवळपास आठ ते दहा दिवस पिकात थांबले होते. यातूनच भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण जिह्यांत अतिवृष्टी झाली होती. पश्चिम भागासह दुष्काळी तालुक्यात दाणादाण झाली. शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर जिह्यातील पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता.

राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत जाहीर केली आहे. राज्यातील 35 जिह्यांमधील सुमारे 94 लाख शेतकऱ्यांसाठी 7,337 कोटी 89 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी सध्या ही मदत प्रति हेक्टर या दराने, दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सांगली जिह्यासाठी 149 कोटी 95 लाख रुपयांची भरपाईची मदत मंजूर झाली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

अतिवृष्टी नुकसानभरपाईची मदत दिवाळीपूर्वी म्हणजे सोमवारी (दि. 20) रोजी जमा होणे अपेक्षित होते, मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. आज मंगळवारपासून (दि. 21) बँकांना सुट्टय़ा आहेत. त्यामुळे अतिवृष्टी भरपाईची मदत लालफितीत अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या गलथान कारभाराचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकरीवर्ग मोठय़ा अपेक्षेने सरकारच्या या मदतीकडे डोळे लावून बसला होता. मात्र सरकारच्या ‘राम भरोसे’ कारभारामुळे वेळेत मदत न मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. हातातले पिकं गेले आणि वेळेत मदतही मिळाली नाही.त्यामुळे दिवाळीऐवजी शिमगा करण्याची पाळी अशा या शेतकऱ्यांवर आली आहे.

Comments are closed.