काँग्रेसला काश्मिरींना तुरुंगात टाकायचे आहे का?

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेसमध्ये ‘वंदे मातरम्’ गाण्यावरून राजकीय मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 'काँग्रेसला काय हवंय? वंदे मातरम न म्हणल्याने काश्मिरी लोकांना तुरुंगात टाकायचे आहे का? असा संतप्त सवाल ओमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार करत म्हटले की, आता संपूर्ण 'वंदे मातरम' गाणे कायद्याने बंधनकारक झाले आहे.

ओमर अब्दुल्ला म्हणाले की, काँग्रेस जर या कायद्याच्या विरोधात असेल तर संसदेत हा कायदा पास होण्यापासून थांबवायला हवा होता. आता हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्याचे पालन करणे कायद्याने बंधनकारक झाले आहे. कायद्यानुसार जिथे राष्ट्रगीत गायले जाते त्या सर्व अधिकृत ठिकाणी ‘वंदे मातरम’ हे पूर्ण गायले जाणे आवश्यक आहे. हा नियम केवळ जम्मू-काश्मीरपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे काँग्रेसशासित राज्यांतील सरकारी कार्यक्रमांनाही हा नियम पाळावा लागेल, असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत 'वंदे मातरम्' संपूर्णपणे गायले गेले. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी नॅशनल कॉन्फरन्सला फक्त पहिले दोन श्लोक गाण्याचे आवाहन केले होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा दाखला देत वेणुगोपाल म्हणाले होते की, स्वातंत्र्यसैनिकांच्या ऐतिहासिक भूमिकेचा आदर केला पाहिजे. यावर आता ओमर अब्दुल्ला यांनी तिखट प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा-

  • ब्रिक्स परिषदेसाठी दिल्लीत हाय अलर्ट; वाढलेली सुरक्षा

Comments are closed.