तीसाव्या दिवशी कोठे, काय घडले… – TMarathiNews
युएईमधील युक्रेनच्या तळावर हल्ला
संयुक्त अरब अमिरातीत (युएई) असलेल्या युव्रेनच्या ड्रोनविरोधी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. या हल्ल्यात या तळावरील 21 सैनिक बेपत्ता झाले आहेत, असेही इराणचे म्हणणे आहे. शनिवारी दुपारी हा हल्ला करण्यात आला असून त्यात हा तळ पूर्ण:त उध्वस्त झाल्याची माहिती इराणकडून प्रसारित केली जात आहे. तथापि, युव्रेनने असा हल्ला झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला असून इराण चुकीचा दावा करीत असल्याची टीका केली आहे. युव्रेनचे हे ड्रोनविरोधी केंद्र संयुक्त अरब अमिरातीत काही वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले आहे. या तळावर इराणविरोधी कारवायांची योजना बनविली जाते. त्यामुळे ते उध्वस्त करण्यात आले, असे प्रतिपादन इराणने केले. तथापि, युक्रेनने इराणवर दिशाभूल करीत असल्याचा आरोप करुन हे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले आहे.
इराण प्रथम नाही हल्ला करणार
अमेरिकेशी भूमीवर युद्ध करण्याचा प्रसंग आलाच, तर प्रथम आक्रमण इराण करणार नाही, अशी घोषणा इराणचे अध्यक्ष पेझेश्कियन यांनी शनिवारी केली आहे. इराण प्रथम आक्रमण करणार नाही. मात्र, इराणच्या आर्थिक आणि ऊर्जा आस्थापनांवर अमेरिकेने हल्ला केल्यास अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. इराण आता युद्धाविषयी सौम्य भूमिका घेत असल्याचे या विधानातून दिसून येते. अमेरिकेने इराणवरील हल्ला 10 दिवसांसाठी थांबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही प्रथम हल्ला करणार नसल्याचे विधान केले. दोन्ही देशांमध्ये मध्यस्थांच्या माध्यमातून बोलणी केली जात आहेत. तथापि, इराणने अधिकृतरित्या चर्चेचे वृत्त नाकारले. अमेरिकेचा भर मात्र, आता अधिकाधिक शांततेच्या चर्चेवर असल्याचे दिसून येत आहे.
टॉमाहॉक क्षेपणास्त्रांच्या अतिउपयोगावर चिंता
या युद्धात गेल्या महिनाभरात अमेरिकेने इराणवर अनेक हल्ले केले असून अमेरिकेच्या सर्वात महाग आणि सर्वात प्रभावी ‘टॉमाहॉक’ क्षेपणास्त्रांचा उपयोग सढळ हस्ते करण्यात आला आहे. अमेरिकेने आतापर्यंत या प्रकारच्या 450 क्षेपणास्त्रांचा उपयोग केला असून यावर अमेरिकेच्याच पेंटागॉन या सर्वोच्च सेनासंस्थेने चिंता व्यक्त केली आहे. हे क्षेपणास्त्र शक्तीशाली असले, तरी त्याच्या निर्मितीला समय आणि संपत्ती दोन्ही अधिक लागतात. या क्षेपणास्त्रांचा उपयोग केवळ अतिआवश्यक असेल तरच केला पाहिजे, असा अलिखित नियम आहे. तथापि, अमेरिकेच्या युद्धव्यवस्थापकांनी तो पाळला नाही. परिणामी या क्षेपणास्त्रांचा अमेरिकेच्या क्षेपणास्त्र विभागाजवळ असणारा साठा घटला आहे. उत्पादन वाढविण्याचा आदेश देण्यात आला असून लवकरच नवी क्षेपणास्त्रे येत आहेत.
इस्रायलचा लेबेनॉनवर हल्ला, अनेक ठार
शनिवारी, युद्धाच्या तीसाव्या दिवशी इस्रायलने लेबेनॉनच्या हिजबुल्ला प्रभावित क्षेत्रावर मोठा हल्ला केला आहे. संपूर्ण दक्षिण लेबेनॉनमधील अनेक लक्ष्यांवर इस्रायलने आपल्या युद्ध विमानांमधून मोठी बाँबफेक केली. या हल्ल्यांमध्ये लेबेनॉनमधील अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे आणि अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दक्षिण लेबेनॉनमधील डायर झरानी आणि अल् हनिया या शहरांवर बाँबफेक करण्यात आली. या हल्ल्यांमध्ये ठार झालेल्यांपैकी अनेक लोक सिरीया या देशाचे नागरीक होते. बैत अल सय्यद आणि अल् मन्सुरी या भागांनाही बाँबफेकीचा तडाखा बसला. अनेक नागरीकांना रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. हल्ल्यात हिजबुल्लाची अनेक स्थाने आणि आस्थापने नष्ट झाली असून या संघटनेला मोठा दणका बसला, असे प्रतिपादन इस्रायलच्या सेनेने केले आहे.
प्रथमच हुती बंडखोरांचा हल्ला
या युद्धाला 1 महिना पूर्ण होत असताना, प्रथमच येमेन या देशाच्या ‘हुती’ बंडखोरांनी इस्रायलवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या वेस्ट बँक भागात हुती बंडखोरांनी अनेक क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त देण्यात आले आहे. तथापि, बरीचशी क्षेपणास्त्रे आकाशातच निकामी करण्यात इस्रायलला यश आल्याची माहिती देण्यात आली. दोन क्षेपणास्त्र मात्र क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेतून निसटून लक्ष्यांवर आदळली. यामुळे काही प्रमाणात हानी झाली. काही इस्रायली नागरीक जखमी झाल्याची माहिती दिली गेली. हुती बंडखोरांनी या युद्धात प्रथमच असा हल्ला केल्याने युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. हुती बंडखोरांना इराणकडूनच प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे आणि आर्थिक साहाय्य मिळत असल्याचा आरोप आहे. हे बंडखोर सौदी अरेबियातही अधून मधून हल्ला करत असतात, अशी माहिती दिली गेली.
Comments are closed.