भेसळयुक्त दुधाच्या सेवनामुळे आंध्रमध्ये १६ जणांचा मृत्यू

इथिलीन ग्लायकॉलमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त

वृत्तसंस्था/ अमरावती

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिह्यात भेसळयुक्त दूध प्यायल्याने घडलेल्या  दुर्घटनेत आतापर्यंत 16 निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. अजूनही तीन रुग्ण आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. लालचेरुवू, चौडेश्वरनगर आणि स्वरूपनगर यांसारख्या भागांमध्ये या घटनेने शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका स्थानिक डेअरी युनिटने पुरवलेल्या दुधात इथिलीन ग्लायकॉल नावाचे एक घातक रसायन असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू आणि अन्न भेसळ यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या भेसळयुक्त दूध सेवनामुळे किडनीला हानी पोहोचल्याचा दावा वैद्यकीय तज्ञांनी केला आहे.

आंध्रातील भेसळयुक्त दूध प्रकरणाची सुरुवात 22 फेब्रुवारी रोजी झाली. नरसपुरम गावातील एका डेअरी युनिटमधून सुमारे 100 कुटुंबांना दूध पोहोचवण्यात आले. दूध प्यायल्यानंतर काही तासांतच, लहान मुले आणि वृद्धांसह अनेक लोकांना उलट्या आणि लघवीचा त्रास होऊ लागला. याप्रसंगी तपासणीत रुग्णांच्या रक्तातील युरिया आणि सीरम क्रिएटिनिनची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढल्यामुळे त्यांना तातडीने डायलिसिस आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज भासली होती.

धक्कादायक खुलासा

आरोग्य विभाग आणि अन्न सुरक्षा अधिक्रायांनी केलेल्या प्राथमिक तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. वाहनांमधील अँटी-फ्रीझमध्ये सामान्यत: वापरले जाणारे इथिलीन ग्लायकोल दुधात मिसळण्यात आले होते. हा पदार्थ मानवी अवयवांसाठी विशेषत: मूत्रपिंडांसाठी एक प्राणघातक विष म्हणून काम करतो.

संशयित दूध विक्रेत्याला अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने युद्धपातळीवर कारवाई केली आहे. पोलिसांनी मुख्य संशयित, एका दूध विक्रेत्याला अटक केली आहे. डेअरी युनिटमधील दूध, दही, तूप आणि पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जनावरांच्या खाद्याचीही बारकाईने तपासणी केली जात आहे. हैदराबादमधील वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक उपचारांवर देखरेख ठेवत आहे. बाधित भागांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षेवर गंभीर प्रश्न

या घटनेमुळे अन्न सुरक्षा प्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दैनंदिन गरजेची वस्तू असलेले दूध, एक प्राणघातक विष बनल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. भेसळ रोखण्यासाठी कडक देखरेख आणि नियमित तपासणी आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी भेसळीचा संपूर्ण स्रोत आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

Comments are closed.