महाराष्ट्रातील 17 एक्स्प्रेस गाड्यांना जुनेच डबे! अद्ययावत ‘एलएचबी’ कोचच्या मागणीचे पत्र केंद्राकडे धूळ खात

वेगवान विकासाचा दिखावा करणाऱ्या केंद्र सरकारने महाराष्ट्राशी दुजाभाव कायम ठेवला आहे. रेल्वे प्रवास आरामदायी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे जुने डबे बदलणे गरजेचे आहे, मात्र महाराष्ट्रातील तब्बल 17 एक्स्प्रेसना अद्याप जुनेच डबे असून त्या गाडय़ांना अद्ययावत ‘एलएचबी’ कोच जोडण्याच्या मागणीचे पत्र केंद्र सरकारकडे दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कोकण विकास समितीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले होते. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेससह इतर गाडय़ांचे जुने डबे बदलून अद्ययावत ‘एलएचबी’ कोच जोडण्याची मागणी केली गेली होती. संबंधित सर्व गाडय़ांना प्रवाशांची खूप गर्दी होते. त्या गर्दीत जुन्या डब्यांमुळे प्रवाशांची घुसमट होते, याकडे लक्ष वेधूनही रेल्वे मंत्रालयाने दोन वर्षांत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे राज्यातील 17 एक्स्प्रेस गाडय़ांची सेवा जुन्या डब्यांच्या माध्यमातून सुरू आहे. रेल्वेच्या मोठमोठय़ा प्रकल्पांची स्वप्ने दाखवणारे केंद्र सरकार ‘एलएचबी’ कोचच्या मागणीकडे दुर्लक्ष का करतेय? हा महाराष्ट्रातील जनतेशी केलेला दुजाभाव नाही का? असे संतप्त सवाल प्रवासी संघटनांकडून उपस्थित केले जात आहेत.

कोकण विकास समितीचे रेल्वेमंत्र्यांना स्मरणपत्र
महाराष्ट्रातून सुटणाऱ्या मध्य रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक एक्स्प्रेस गाडय़ांना जुने ‘आयसीएफ’चे डबे आहेत. हे डबे लवकरात लवकर बदलण्यासाठी आम्ही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पुन्हा एकदा आठवण म्हणून स्मरणपत्र पाठवले आहे. दोन वर्षांपासून आमची मागणी प्रलंबित आहे, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर आणि कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी सांगितले.

जुन्या डब्यांच्या एक्स्प्रेस

  • दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस.
  • कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस.
  • नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस.
  • मराठवाडा एक्स्प्रेस.
  • नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस.
  • कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस.
  • नंदीग्राम एक्सप्रेस.
  • दादर-सातारा एक्स्प्रेस.
  • दादर-शिर्डी एक्स्प्रेस (व्हाया पुणे).
  • दादर-शिर्डी एक्स्प्रेस (व्हाया मनमाड दोन गाडय़ा).
  • पुणे-अमरावती एक्स्प्रेस.
  • मुंबई-लातूर एक्स्प्रेस.
  • मुंबई-बिदर एक्सप्रेस.
  • नागपूर-मडगाव एक्स्प्रेस.
  • कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस.
  • दादर-भुसावळ एक्स्प्रेस.

Comments are closed.