वन हत्तींच्या संख्येत १८ टक्के घट
देशात पहिल्यांदाच डीएनए आधारित गणना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात वनहत्तींच्या पहिल्यांदा झालेल्या डीएनए आधारित गणनेनुसार त्यांच्या संख्येत 18 टक्क्यांची घट झाली आहे. यानुसार भारतात जंगली हत्तींची संख्या 22,446 इतकी आहे. 2017 च्या 27,312 पेक्षा हा आकडा खुपच कमी आहे. अखिल भारतीय समकालीन हत्ती अनुमान (एसएआयईई) 2025 नुसार भारतात रानटी हत्तींची संख्या 18,255 ते 26,645 दरम्यान असण्याचा अनुमान असून याची सरासरी 22,46 इतकी आहे.
2021 मध्ये सर्वेक्षण सुरू झाल्याच्या जवळपास 4 वर्षांनी सरकारने दीर्घकाळापासून प्रलंबित अहवाल जारी केला आहे. अहवाल जारी करण्यास झालेला विलंब आनुवांशिक विश्लेषण आणि आकडेवारीच्या पडताळणीमुळे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अहवालात नमूद क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार पश्चिम घाट 11,394 हत्तींसह सर्वात मोठा अधिवास ठरला आहे, त्यानंतर उत्तरपूर्व पर्वतीय भाग आणि ब्रह्मपुत्रेचे मैदान 6,559 हत्तींसह दुसऱ्या स्थानावर आहे. मध्य आणि पूर्व भारतातील काही हिस्स्यांमध्ये, मध्यप्रदेश (97) आणि महाराष्ट्र (63) यासारख्या राज्यांमध्ये हत्तींचे छोटे कळप असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
पर्यावरण मंत्रालय, प्रोजेक्ट एलिफेंट आणि भारतीय वन्यजीव संस्थेकडून संयुक्त स्वरुपात करण्यात आलेले 2025 चे हे सर्वेक्षण भविष्यातील देखरेख आणि संरक्षण योजनेसाठी एक नवा वैज्ञानिक आधार स्थापित करणारा आहे. नव्या गणनेत जमिनीवरील सर्वेक्षण, उपग्रह आधारित नकाशा आणि आनुवांशिक विश्लेषणाला मिळून तीन टप्प्यांच्या प्रक्रियेचा वापर करण्यात आला.
शिवालिक पर्वतरांग अन् गंगेचे मैदान
अहवालानुसार शिवालिक पर्वतरांग आणि गंगेच्या मैदानांमध्ये 2,062 हत्तींचा अधिवास आहे, तर मध्य भारत आणि पूर्व घाटांमध्ये 1,891 हत्ती संचार करत आहेत. आकडेवारीनुसार कर्नाटकात सर्वाधिक 6,013 हत्ती असून त्यानंतर आसाम (4,159), तामिळनाडू (3,136), केरळ (2,785) आणि उत्तराखंडचे (1,792) स्थान आहे. ओडिशात 912 हत्ती आहेत, तर छत्तीसगड आणि झारखंडमध्ये संयुक्त स्वरुपात 650 हून अधिक हत्ती आहेत. ईशान्येतील राज्ये म्हणजेच अरुणाचल प्रदेश (617), मेघालय (677), नागालँड (252) आणि त्रिपुरातही (153) हत्तींची काही प्रमाणात संख्या आहे.
Comments are closed.