राजस्थानमध्ये अपघातात 19 जणांचा मृत्यू

मद्यधुंद डंपर चालकाने दिली 17 वाहनांना धडक

वृत्तसंस्था / जयपूर (राजस्थान)

राजस्थानची राजधानी जयपूर येथे महामार्गावर झालेल्या अपघातात 19 जणांचा बळी गेला आहे. मद्यधुंद अवस्थेत डंपर चालविणाऱ्या चालकाने मार्गावरील 17 वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडला. या डंपर चालकाने तशाच अवस्थेत डंपर जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चालविला आणि वाटेत येतील त्या वाहनांना धडका दिल्या, अशी माहिती जयपूर वाहतून पोलिसांकडून देण्यात आली आहे.

जयपूरमधील गर्दीच्या लोकमंडी मार्गावर ही दुर्घटना सोमवारी घडली. मद्यप्राशन केलेल्या या चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे डंपरने अनेक मोटरसायकली, कार्स आणि इतर वाहनांना ठोकरले. अनेक वाहनांवरुन त्याचा डंपर गेल्याने या वाहनांचा चेंदामेंदा झाला आणि या वाहनांमधील अनेक नागरीकांचा मृत्यू झाला. डंपरवरील नियंत्रण सुटल्यानंतर तो थांबविण्याचा प्रयत्न करण्याचे भानही या चालकाला राहिलेले नव्हते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी नंतर दिली.

धडकांमुळेच थांबला डंपर

अनेक वाहनांना धडक दिल्याने डंपरचा वेग कमी झाला आणि नंतर एक दोन कार्सना ठोकरल्यानंतर तो पूर्णपणे थांबला. या डंपरच्या चालकाला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याचे या तपासणीतून आढळून आल्याची माहिती देण्यात आली.

चालकाची कसून चौकशी होणार

डंपर चालकाची कसून चौकशी करण्यात येणार आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक वाहनांवर आणि खाली पडलेल्या लोकांवर अनेकदा डंपल चालविला आहे. त्यामुळे ही दुर्घटना केवळ मद्याच्या नशेमुळे झाली आहे, की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचेही अन्वेषण करण्यात येत आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. राजस्थान सरकारनेही या घटनेच्या सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत.

दोन दिवसांमध्ये दोन अपघात

रविवारीही राजस्थानातील फालोदी येथे टेंपो अपघातात 15 यात्रेकरुंचा मृत्यू झाला होता. हे यात्रेकरु जोधपूरचे होते. ते बिकानेर येथील कपिल मुनी आश्रमात प्रार्थना करुन टेंपोतून कोलायत मंदिरात परत जात होते. त्यावेळी त्यांच्या टेंपोवर वाहन आदळ्याने हा अपघात झाला होता. या अपघाताचीही चौकशी होत आहे.

मुख्यमंत्र्यांचा प्रशासनाला आदेश

जखमी लोकांना आणि मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व साहाय्य त्वरित करावे, असा आदेश राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रशासनाला दिला आहे. ते स्वत: बचावकार्यावर लक्ष ठेवीत आहेत. जखमींवरील उपचारांचा खर्च प्रशासनाकडून केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. या दोन्ही अपघातांमधील जखमींवर संबंधित रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातांसंबंधी अतीव दु:ख व्यक्त केले आहे.

Comments are closed.