19 नक्षलवादी छत्तीसगडमध्ये शरण जातात
नऊ जणांवर 28 लाखांचे बक्षीस : बस्तरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश
वृत्तसंस्था/ बिजापूर
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. 19 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या 9 नक्षलवाद्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. 2025 मध्ये आतापर्यंत जिह्यात 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तर सुरक्षा दलांनी 137 नक्षलवाद्यांना अटक केली. त्याचवेळी, जिह्यात वेगवेगळ्या चकमकींमध्ये 56 नक्षलवादी मारले गेले आहेत.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये देवा पदम, देवाची पत्नी दुले कलामू, सुरेश कट्टम, सोनी पुनीम, नारायण कट्टम, अंडा माडवी, बामी कुहरामी, शंकर काडती आणि मुन्ना पोडियम अशा मोठ्या नावांचा समावेश आहे. बटालियन नंबर-1चे सदस्य देवा पदम आणि दुले कमलू यांच्यावर प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. क्षेत्र समिती सदस्य सुरेश कट्टम याच्यावर 5 लाख रुपये आणि पक्ष सदस्य सोनी पुनीम याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याव्यतिरिक्त नक्षलवादी नारायण कट्टम, अंडा माडवी, बामी कुहरामी, शंकर काडती आणि मुन्ना पोडियम यांच्यावर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस होते.
आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी संघटनेच्या विचारसरणीने निराश झाले होते. संघटनेतील वाढत्या अंतर्गत मतभेदांमुळे नाराज असल्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी आणि सुरक्षित कौटुंबिक जीवन जगण्यासाठी त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेल्या सर्व नक्षलवाद्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 25,000 रुपये रोख रक्कम देण्यात आली आहे.
Comments are closed.