पाशांकुशा एकादशीनिमित्त पंढरीत 2 लाखांवर भाविक, श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पाशांकुशा एकादशीनिमित्त शुक्रवारी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. चंद्रभागा घाट, वाळवंट, मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग भाविकांनी फुलून गेले. दिवसभर दोन लाखांवर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्शन रांग 3 कि.मी. पर्यंत गेली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना मुलभूत सेवा सुविधा मंदिर समितीकडून पुरवण्यात येत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, परतीच्या पावसाने राज्यात पूरपरिस्थिती निर्माण केली. सीना, भीमा नदी काठी शेतीपिकांचे, नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विठ्ठला आता नको पाऊस, बस्स कर, अशी आर्त हाक भाविक देत होते
पाशांकुशा एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग फुलून गेला आहे. चंद्रभागा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून मुबलक पाणी सोडण्यात आल्यामुळे एकादशीला आलेल्या भाविकांनी दिवसभर स्नानाचा आनंद घेतला. तर चंद्रभागेत पाणी जास्त असल्याने स्नान करण्यासाठी जाणार्या भाविकांना विशेष सुचना दिल्या जात आहेत. जास्त पाण्यात जाण्यास भाविकांना मज्जाव करण्यात येत आहे. चंद्रभागा स्नानानंतर पदस्पर्श दर्शन तसेच मुख दर्शन व कळस दर्शन घेण्यास भाविक प्राधान्य देत होते. सकाळी पदस्पर्श दर्शन पत्राशेडच्या जवळ पोहोचली आहे. तसेच प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग, स्टेशन रोड भाविकांनी फुलून गेला आहे.
पाशांकुशा एकादशीला आलेल्या भाविकांच्या वाहनांनी देखील शहरातील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले आहे. गजानन महाराज मठालगतचे वाहन तळ फुल झाल्याने बहूतांश वाहने रस्त्याच्या बाजुला दुतर्फा लावण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थ हे व्हि.आय.पी. वाहनांसाठी पार्कींग म्हणून आषाढी यात्रेपासून उपयोगात आणले जात आहे. परंतू, एकादशी दिवशी या पार्किंगच्या ठिकाणावर हातगाडे, स्टॉलधारकांनी दुकाने लावल्याने वाहने पार्किंग करता आली नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सतत होताना दिसून आली. यातच शहातील बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. चौकाचौकात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. मात्र, याकडे चौकात थांबलेल्या वाहतुक पोलीसांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. मंदिराचे जुने पुरातन रुप भाविकांना डोळ्यात साठवता येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा करण्यास भाविक पसंती देत आहेत. पाशांकुशा एकशीला आलेल्या भाविकांमुळे पंढरी नगरी गर्दीने फुलून गेली आहे.
पापाची मुक्ती आणि मोक्षाची प्राप्ती-
पापाची मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होते, अशी या पाशांकुशा एकादशी चे वैशिष्टये आहे. त्यामुळे पंढरपूरला येणे आणि मोक्ष प्राप्त करुन घेण्यासाठी भाविक एकादशी करतात. पाशांकुशा एकादशी केल्याने पापाचा अंत होतो आणि पुण्य लाभते, अशी भावना भाविकांमध्ये आहे. असे भागवत महाराज चवरे यांनी पाशांकुशा एकादशीचे महत्व सांगीतले.
Comments are closed.