जम्मू ज्युवेनाईल सेंटरमधून २ पाकिस्तानी पळाले
पंजाबमध्ये घेतले ताब्यात : पोलिसांवर केला गोळीबार : 3 अधिकारी निलंबित
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये ज्युवेनाइल ऑब्जर्वेशन सेंटरमधून 2 पाकिस्तानी नागरिकांसमवेत 3 अल्पवयीन फरार झाले होते. याप्रकरणी मंगळवारी 6 पोलिसांना निलंबित करण्यात आले असून चौकशी करण्यात येत आहे. अल्पवयीन फरार होण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. तर या फरार अल्पवयीनांना पंजाब येथे ताब्यात घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
सोमवारी संध्याकाळी सुमारे 5.15 वाजता दोन अल्पवयीन भांडत होते. सेंटरचे दोन कर्मचारी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करत असताना टोपी घातलेला अल्पवयीन मागून येतो आणि कर्मचाऱ्याच्या दिशेने गोळीबार करतो. यानंतर दोन्ही कर्मचारी मागे हटतात. अल्पवयीन पुन्हा गन लोड करतो आणि दुसऱ्यांदा गोळीबाराचा प्रयत्न करतो, परंतु त्यात तो यशस्वी होत नाही. कॅप परिधान केलेला मुलगा आणि पांढऱ्या जॅकेटमधील मुलगा कर्मचाऱ्यांवर हल्ला करत असल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. या घटनेनंतर तीन अल्पवयीनांनी सेंटरमधून पळ काढला आहे. तर ज्युवेनाइल सेंटरमधून फरार एका अल्पवयीनाची आईही बेपत्ता झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
गोळीबारात दोन पोलीस जखमी
अल्पवयीनाने केलेल्या गोळीबारात विनय कुमार आणि प्रवीण कुमार हे पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अल्पवयीनाकडे पिस्तुल कसे पोहोचले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. फरार कैद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची स्थापना केली आहे. ही पथके विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. ज्युवेनाइल ऑब्जर्वेशन सेंटरच्या सुरक्षेवरून अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी आसपासच्या भागांमध्ये सतर्कता वाढविली आहे.
Comments are closed.