पाकिस्तान सीमेवर 2 पोलीस शहीद

पंजाबमध्ये उडाली खळबळ

वृत्तसंस्था/ गुरदासपूर

पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात पाकिस्तान सीमेनजीक एका सुरक्षा चौकीवर रविवारी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही पोलिसांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे. घटनेची संवेदनशीलता पाहता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम्सनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही घटना दोरांगला पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अडियान गावात घडली आहे. साहाय्यक उपनिरीक्षक अशोक कुमार आणि हेड कॉन्स्टेबल गुरनाम सिंह अशी मृतांची नावे आहेत. हे दोन्ही पोलीस कर्मचारी पाक सीमेनजीकच्या एका तपासणी  नाक्यावर तैनात होते, ज्याला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ‘सेकंड लाइन ऑफ डिफेन्स’ मानले जाते.

तपासणी नाक्यानजीक अचानक गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला, जेव्हा अन्य सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस तेथे पोहोचले तेव्हा दोन्ही पोलीस कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले. त्यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

घटनेवेळी तेथे कुठलाही प्रत्यक्षदर्शी नव्हता, यामुळे पोलिसांसमोर यामागील रहस्याची उकल करण्याचे आव्हान आहे. दोन्ही पोलिसांदरम्यान कुठल्या कारणावरून वाद होत त्यांनी परस्परांवर गोळी झाडली का तसेच या घटनेत त्रयस्थ व्यक्तीचा हात आहे असे प्रश्न पोलिसांसमोर उभे ठाकले आहेत.

पोलिसांनी पूर्ण परिसराला घेरून तपास हाती घेतला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे जमवत गोळ्या कुठल्या शस्त्रास्त्राद्वारे आणि कुठल्या दिशेकडून झाडण्यात आल्या याचा शोध चालविला आहे. हा भाग आंतरराष्ट्रीय सीमेच्या अत्यंत नजीक असल्याने सुरक्षा यंत्रणा याप्रकाराला गांभीर्याने घेत आहेत. पोलीस याप्रकरणी अधिकृत वक्तव्य करणे टाळत असून सर्व पैलूंना विचार करत तपास केला जात आहे.

 

Comments are closed.