काश्मीरमध्ये 2 दहशतवादी ठार
सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळला : गुरेज सेक्टरमध्ये चकमक
मंडळ/श्रीनगर
नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न सैन्याने गुरुवारी उधळून लावला. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहारानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरेज सेक्टरच्या नौशेरा नर्दमध्ये नियंत्रण रेषा ओलांडू पाहणाऱ्या 2 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी यमसदनी पाठविले आहे. सैन्याच्या चिनार कोरकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. घुसखोरीच्या संभाव्य प्रयत्नाविषयी गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यावर सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरेज सेक्टरमध्ये संयुक्त अभियान राबविले.
संशयास्पद हालचाली दिसून आल्यावर सुरक्षा दलांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला, ज्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला, जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे चिनार कोरकडून सांगण्यात आले. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरच्या तुरिना भागात रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक झाली होती, ज्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी या भागात मोठी शोधमोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलांना पाहून गोळीबार करत दहशतवाद्यांनी घनदाट जंगलात पलायन केले होते. यानंतर सैन्य, पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी पूर्ण परिसराला घेरले होते. यात ड्रोन्स, श्वानपथकाच्या मदतीने जंगल आणि आसपासच्या भागांमध्ये शोध घेण्यात आला होता.
Comments are closed.