20 दार्जिलिंगमध्ये भूस्खलनात मारले गेले
पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार : पूल, घरे कोसळली; युद्धपातळीवर बचावकार्य
वृत्तसंस्था/ कोलकाता, दार्जिलिंग
पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसानंतर दार्जिलिंगमध्ये सात ठिकाणी भूस्खलन झाले. मिरिक आणि दार्जिलिंग टेकड्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मुलांसह किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. भूस्खलन आणि पावसामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. तसेच रस्ते बंद झाल्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. या दुर्घटनांमुळे शेकडो पर्यटक ठिकठिकाणी अडकले असल्याची माहिती रविवारी अधिकाऱ्यांनी दिली.
एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाने संकलित केलेल्या अहवालांनुसार, सरसली, जसबीरगाव, मिरिक बस्ती, धार गाव (मेची), नगरकाटा आणि मिरिक तलाव परिसरात अनेक ठिकाणी मृत्यूची नोंद झाली आहे. मिरिक-सुखियापोखरी रस्त्यावरील डोंगराचा काही भाग कोसळून अनेक घरे उद्ध्वस्त झाली. येथे 13 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दार्जिलिंगमध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती प्रतिसाद पथकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. भूस्खलनानंतर रस्त्यावरील ढिगाऱ्यांमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. आजूबाजूच्या अनेक भागात वाहनांची रहदारी आणि दळणवळण विस्कळीत झाले आहे. मिरिकमध्ये एक लोखंडी पूलही कोसळला आहे. दार्जिलिंगमध्ये पूल कोसळून झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले.
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या या आपत्तीत मोठी वित्तहानीही झाली आहे. तिस्ता बाजाराजवळील बालुखोला येथील पुरामुळे सिलिगुडीला सिक्कीम आणि कालिम्पोंगशी जोडणारा महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. दार्जिलिंग शहराच्या अनेक भागांशी संपर्कही तुटला आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबविण्यात येत आहे.
उत्तर बंगालमध्ये रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दार्जिलिंग जिल्हा पोलिसांकडून बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे दार्जिलिंगमधील सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे बंगाल आणि सिक्कीममधील रस्ते बंद झाल्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.
सिक्कीमाध्य रेड अलर्ट जारी केला
मुसळधार पावसामुळे सिक्कीममध्ये हवामान खात्याने आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. आयएमडीने 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 12:40 आणि 03:40 वाजता सिक्कीमच्या सर्व सहा जिह्यांसाठी रेड अलर्ट जारी केले होते. यादरम्यान विजांसह मध्यम वादळ, मुसळधार पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज होता. आयएमडीने 30 सप्टेंबरपासून या प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. जोरदार पावसाचे हे सत्र 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
Comments are closed.