INDvsENG सेमीफायनलमध्ये जो जिंकणार तोच टी 20 वर्ल्ड कपचा विजेता! लागोपाठ तिसऱ्यांदा ‘हा’ योगायोग

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. भारताने रविवारी (१ मार्च) सुपर-८च्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे ते ग्रुप-१ मध्ये दुसऱ्या स्थानावर आले. त्यांचा सामना ग्रुप-२ मध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या संघाशी होणार असल्याने इंग्लंड तो संघ आहे, मात्र एक माहिती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. टी२० विश्वचषकात भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत तिसऱ्यांदा समोरा-समोर येणार आहेत.
पुरुष संघांच्या टी२० विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत दोन उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले आहेत. यामुळे ते २०२६मध्ये तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत भिडणार आहेत. २०२२मध्ये हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमने-सामने आले होते, तो सामना इंग्लंडने जिंकला होता. त्यानंतर भारताने २०२४मध्ये त्याचा बदला घेतला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
त्याचबरोबर मागील दोन टी२० विश्वचषकात या दोन संघांमधील जो संघ उपांत्य फेरीत जिंकला, तो पुढे विश्वविजेता ठरला आहे. २०२२मध्ये इंग्लंडने भारताला १० विकेट्सने पराभूत केले होते आणि त्यांनी विजेतेपदही जिंकले. नेमके तसेच भारताने २०२४मध्ये केले. आता ते तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत भिडणार आहेत. आता यामध्ये कोण जिंकणार आणि विश्वविजेतेपदाचा मानकरी कोण ठरणार हे पाहणे चुरशीचे ठरेल.
टी२० विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात साखळी फेरी किंवा सुपर-८चे सामने मागील १४ वर्षापासून खेळले गेले नाहीत. हे दोन्ही संघांत २०१२मध्ये शेवटचे साखळी फेरीत भिडले होते. तो सामना भारताने ९० धावांनी जिंकला होता.
टी२० विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामने खेळले गेले आहेत. त्यामधील ३ सामने भारताने आणि २ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.
Comments are closed.