IND vs ENG: 21 वर्षांचा रेकाॅर्ड मोडला, 21व्या शतकात पहिल्यांदाच बनला 'असा' रेकॉर्ड!

Ind vs ENG 5th व्या चाचणी: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेत सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. कसोटी मालिकेत दोन्ही संघांकडून फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले असून धावांचा पाऊस पाडला आहे. पाचव्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि आकाश दीप यांच्यात 107 धावांची शतकी भागीदारी झाली आहे. जयस्वालने शतक झळकावले आहे, तर आकाश दीप अर्धशतक करून बाद झाला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सध्याच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत एकूण 18 वेळा शतकी भागीदारी झाली आहे. जी 21 व्या शतकातील सर्वाधिक आहे. तसेच, 21 व्या शतकात असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा कोणत्याही कसोटी मालिकेत 18 वेळा शतकी भागीदारी झाली आहे. यापूर्वी 2003-04 मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली गेली होती, तेव्हा त्या मालिकेतील शेवटचा सामना 2004 मध्ये खेळला गेला होता. त्या मालिकेत 17 वेळा शतकी भागीदाऱ्या झाल्या होत्या. आता 21 वर्षांचा हा रेकाॅर्डही मोडला आहे. (Century Partnerships Test Cricket)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा भारतीय कर्णधार शुबमन गिलने केल्या आहेत. त्याने 5 सामन्यांमध्ये एकूण 754 धावा केल्या आहेत, ज्यात त्याच्या बॅटमधून 4 शतके निघाली आहेत. तर केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 5 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 532 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतकांचा समावेश आहे. रिषभ पंत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे, पण त्याने मालिकेतील 4 सामन्यांमध्ये 479 धावा केल्या आहेत, ज्यात त्याने 2 शतके झळकावली आहेत.

दुसरीकडे, खालच्या फळीत फलंदाजीसाठी उतरणारे रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. या दोन्ही खेळाडूंमुळेच भारतीय संघ चौथा कसोटी सामना अनिर्णित राखू शकला. जडेजाने 463 धावा आणि सुंदरने 231 धावा केल्या आहेत. या दोन्ही खेळाडूंनी मालिकेत प्रत्येकी 1-1 शतक झळकावले आहे. (Ravindra Jadeja And Washington Sundar Batting)

कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने 5 विकेट्सने जिंकला होता. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन करत 336 धावांनी सामना जिंकला. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे जिंकण्याची संधी होती, पण त्यांना 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. आता जर भारतीय संघ पाचवा कसोटी सामना जिंकला, तर ते मालिकेत बरोबरी साधतील. (IND vs ENG Test Series Records)

Comments are closed.