कांगोमध्ये इबोलामुळे आतापर्यंत 232 जणांचा मृत्यू झाला आहे.
संक्रमितांची संख्या पोहोचली 896 वर
वृत्तसंस्था/ किवू
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये इबोला विषाणूचा धोका वाढतच आहे. देशातील इबोलाच्या पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या आता 896 वर पोहोचली आहे. तसेच या प्राणघातक आजाराने आतापर्यंत 232 लोकांचा बळी घेतला आहे. गेल्या दोन दिवसात इतुरी आणि उत्तर किवू प्रांतांमध्ये इबोलाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
इबोलाचा प्रादुर्भाव आता इतुरी, उत्तर किवू आणि दक्षिण किवू या काँगोच्या तीन पूर्व प्रांतांमधील 33 आरोग्य क्षेत्रांमध्ये पसरला आहे. सध्या 383 रुग्ण रुग्णालयात किंवा विलगीकरणात आहेत. याचदरम्यान दिलासादायक बाब म्हणजे, 78 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. या संकटाच्या काळात, संयुक्त राष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे आपत्कालीन मदत समन्वयक टॉम फ्लेचर यांनी युगांडामधील इबोलाचा सामना करण्यासाठी 4 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मंजूर केले आहेत. हा निधी संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रीय आपत्कालीन प्रतिसाद निधीमधून देण्यात आला आहे. युनिसेफ आणि जागतिक अन्न कार्यक्रम (आयएफपी) यांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय संस्था या प्रयत्नांना पाठिंबा देत आहेत.
Comments are closed.