कोल्हापुरातील 24292 आजी-आजोबा देणार परीक्षा, रविवारी दीडशे गुणांचा पेपर होणार

दहावी-बारावीच्या परीक्षेतून नातवंडे मोकळी होताच, आता घरातील निरक्षर आजी-आजोबांची परीक्षा होणार आहे. ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रमातून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या या प्रौढांची येत्या रविवारी (दि. २३) प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातून तब्बल आठ लाख प्रौढ या परीक्षेला बसणार आहेत. तर, कोल्हापूर जिल्ह्यात २४२९२ आजी-आजोबांची रविवारी परीक्षा होणार आहे.

या परीक्षेच्या अनुषंगाने तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा शिक्षण योजना विभागातर्फे सांगितले आहे. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातून निरक्षरांचे सर्वेक्षण केले आहे. या योजनेला ‘उल्लास’ असेही नाव आहे.

केंद्र पुरस्कृत ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रमात गेल्या वर्षभरापासून असाक्षरांची नोंदणी आणि त्यांचा अभ्यासवर्ग सुरू आहे. आता त्यांची परीक्षा घेऊन त्यांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी १७ मार्च रोजी झालेल्या या परीक्षेतून सुमारे पाच लाख प्रौढांनी साक्षर होण्याचा आनंद मिळविला आहे. आता राज्यात आणखी आठ लाख आजी-आजोबांना साक्षर होण्याची संधी चालून आली आहे. यंदा राज्यभरातून सुमारे आठ लाख आजी-आजोबा परीक्षा देणार आहेत.

राज्यात ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रम शिक्षण संचालनालयामार्फत राबवला जात आहे. शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, असाक्षर प्रौढांनी ज्या शाळेतून नोंदणी केली, ती शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र राहणार आहे.

२०२४-२५ या सत्रात नोंदणी झालेल्या असाक्षरांबरोबरच मागील वर्षी ज्यांना ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा मिळाला होता, त्यांनीही परीक्षेला बसायचे आहे. तसेच मागील वर्षी नोंदणी करूनही ज्यांनी परीक्षा दिली नाही, त्यांनाही यंदा परीक्षेला बसायचे आहे. मच्छिंद्र मोहिते, तालुका समन्वयक, राधानगरी

Comments are closed.