25 दिवसांची झुंज, 5 कसोट्यांचा थरार! शेवटच्या 35 धावांत ठरणार मालिकेचं भविष्य

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील नव्या टीम इंडियाने इंग्लंडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा फारशा अपेक्षा नव्हत्या. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज निवृत्त झाल्यानंतर या युवा संघाकडे कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. एअरपोर्टवर स्वागत करणारा नव्हता, सराव सत्राला गर्दी नव्हती. पण मालिकेच्या प्रवासात भारतीय खेळाडूंनी हळूहळू चाहत्यांची मने जिंकली आणि आता मालिकेचा रोमांच इतका वाढला आहे की प्रेक्षक दाताखाली बोटं चावायला लागले आहेत.

5 कसोटींच्या 25 दिवसांच्या मेहनतीनंतर आता फक्त 35 धावा आणि 4 बळी निकाल ठरवणार आहेत. इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. जर इंग्लंड हे 35 धावा काढण्यात यशस्वी झाला तर मालिका त्यांच्या नावावर जाईल; पण भारताने जर उरलेले 4 गडी बाद केले, तर मालिका 2-2 अशी बरोबरीत संपेल. युवा कर्णधार गिल आणि नव्या भारतीय संघासाठी इंग्लंडमध्ये मालिका ड्रॉ करणेही मोठे यश मानले जाईल.

कसोटी क्रिकेटला चित्रपटांपेक्षाही जास्त थ्रिलिंग का म्हटलं जातं, याचं उत्तम उदाहरण या मालिकेत पाहायला मिळालं. पाचवी कसोटी सुरू झाली तेव्हा भारत बॅकफुटवर होता. इंग्लंडने ग्रीन विकेट तयार केली होती आणि जसप्रीत बुमराह अनुपस्थित होता. पहिल्या डावात भारत 224 धावांत गडगडला.

इंग्लंडच्या डावात झॅक क्रॉली आणि बेन डकेटने धडाकेबाज सुरुवात केली, पण भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत इंग्लंडला 247 वर रोखलं. 23 धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या शतकासह रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 396 धावा करत इंग्लंडपुढे 374 धावांचं लक्ष्य ठेवलं.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात थरार रंगला. तिसऱ्या दिवसाअखेर भारताला फक्त क्रॉलीचा बळी मिळाला होता, पण डकेटनं खेळ उघडून ठेवला. चौथ्या दिवशी डकेट आणि पोप लवकर बाद झाले, पण जो रूट आणि हॅरी ब्रूकनं शतकं ठोकत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. एक क्षणी हॅरी ब्रूक बाद होण्याची संधी आली होती, पण मोहम्मद सिराजनं कॅच घेताना सीमारेषेपलीकडे पाय ठेवला. मात्र प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीपनं रूट आणि ब्रूकला माघारी पाठवत भारताला पुन्हा रंगात आणलं. यानंतर पावसामुळे सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला आणि थरार आणखी वाढला आहे.

चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने 6 गड्यांच्या मोबदल्यात 339 धावा केल्या आहेत. सामन्याचं महत्त्व इतकं आहे की पहिल्या दिवशी दुखापत झालेला क्रिस वोक्सही पाचव्या दिवशी फलंदाजीसाठी तयार आहे.

Comments are closed.