25 लाख महिलांना विनामूल्य एलपीजी कनेक्शन मिळेल
उज्ज्वला योजनेच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने सोमवारी घटस्थापनेचा मुहूर्त साधत उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत नजिकच्या काळात 25 लाख महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने केलेल्या या घोषणेमुळे कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (पीएमयूवाय) 25 लाख नवीन एलपीजी कनेक्शन देण्यास मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे यासंबंधीची माहिती व्हायरल केली. ‘नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, मी उज्ज्वला कुटुंबाशी संबंधित सर्व माता आणि भगिनींना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. सरकारने 25 लाख नवीन कनेक्शन देण्यास मंजुरी दिली आहे. हे पाऊल महिलांना या शुभ मुहूर्तावर आनंद देणार नाही तर महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आपला संकल्पही बळकट करेल’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख नवीन एलपीजी कनेक्शन देण्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही यासंबंधी अधिकृत माहिती जारी केली आहे. ‘नवरात्रीच्या सुरुवातीलाच, उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख डिपॉझिट-फ्री स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देवी दुर्गासारख्या महिलांचा आदर करण्याच्या वचनबद्धतेचा आणखी एक पुरावा असल्याचे ते म्हणाले. या निर्णयामुळे माता आणि बहिणींचा आदर आणि सक्षमीकरण करण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ होतो. या 25 लाख नवीन कनेक्शनसह देशभरातील उज्ज्वला कुटुंबातील सदस्यांची संख्या 10.58 कोटी होईल, असे केंद्रीय मंत्री पुरी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकार प्रत्येक कनेक्शनवर 2,050 रुपये खर्च करणार
भारत सरकार प्रत्येक कनेक्शनवर 2,050 रुपये खर्च करणार आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडर, गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर इत्यादी मोफत मिळतील, असे हरदीप सिंग पुरी म्हणाले. उज्ज्वला योजना ही केवळ एक योजना नाही तर ती देशातील एका मोठ्या क्रांतीची मशाल बनली आहे. या योजनेची ज्योत देशाच्या कानाकोपऱ्यात, अगदी दुर्गम भागातही पोहोचली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या केंद्र सरकार उज्ज्वला लाभार्थींना प्रतिसिलिंडर 300 रुपये अनुदान देते. याचा लाभ सध्या 10.33 कुटुंबाना मिळत असून त्यांना केवळ साडेपाचशे रुपयांच्या आसपास एवढ्या कमी किमतीत सिलिंडर उपलब्ध होत असतो.
टप्प्याटप्प्याने योजनेत क्रांती
मे 2016 मध्ये सुरू झालेल्या ‘पीएमयूवाय’ने सुरुवातीला 8 कोटी एलपीजी कनेक्शनचे लक्ष्य ठेवले होते. हे उद्दिष्ट सप्टेंबर 2019 मध्ये साध्य झाल्यानंतर उर्वरित गरीब कुटुंबांना योजनेचे फायदे देण्यासाठी ऑगस्ट 2021 मध्ये ‘उज्ज्वला 2.0’ सुरू करण्यात आली. याअंतर्गत जानेवारी 2022 पर्यंत 1 कोटी अतिरिक्त कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. सरकारने उज्ज्वला 2.0 अंतर्गत 60 लाख अतिरिक्त कनेक्शन मंजूर केले. हे उद्दिष्ट डिसेंबर 2022 पर्यंत साध्य झाले होते. जुलै 2025 पर्यंत देशभरात 10.33 कोटीहून अधिक पीएमयूवाय कनेक्शन जारी करण्यात आल्यामुळे ते जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या स्वच्छ ऊर्जा उपक्रमांपैकी एक बनले आहे.
Comments are closed.