26 चौकार, 6 षटकार आणि शतक! 'या' दोन भारतीयांची ऑस्ट्रेलियावर जबरदस्त फटकेबाजी
टीम इंडियाच्या 2 स्टार खेळाडूंनी फलंदाजीने कमाल करत जबरदस्त शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलिया ए ची पुरती वाताहत केली. लखनौच्या भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या अनऑफिशियल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया ए ने पहिल्या डावात 6 विकेट गमावून 532 धावा केल्या तेव्हा त्यांना वाटले होते की हा स्कोर पुरेसा ठरेल. पण इंडिया ए च्या देवदत्त पडिक्कल आणि विकेटकीपर ध्रुव जुरेल यांनी काही वेगळंच काहीतरी ठरवले होते. हे दोघं क्रीजवर उतरले आणि चौकार-षटकारांची आतषबाजी केली.
या सामन्यात टीम इंडियाने 222 धावांवर कर्णधार श्रेयस अय्यरसह एकूण 4 गडी गमावले होते. त्यामुळे सुरुवातीला पडिक्कल आणि जुरेल दोघांनी सावधपणे खेळ केला. पण एकदा डोळे क्रीजवर सरावले की मग हात उघडले आणि शतक ठोकत टीमला 500च्या पुढे घेऊन गेले. या दोघांनी मिळून कांगारू गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. याची कल्पना यावरूनच येते की दोघांनी मिळून तब्बल 291 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 26 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. म्हणजेच अर्ध्याहून अधिक धावा या जोडीनेच केल्या.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या देवदत्त पडिक्कलने 287 चेंडूत 156 धावा केल्या. त्याने 14 चौकार आणि 1 षटकार लगावला. अखेरीस तो स्पिनर रोच्चिचियोलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या ध्रुव जुरेलने केवळ 114 चेंडूत शतक ठोकले आणि 189 चेंडूत 12 चौकार व 5 षटकारांसह एकूण 135 धावा केल्या. शेवटी तो फर्गस ओ’नील या गोलंदाजाचा शिकार ठरला. पण दोघंही जेव्हा बाद झाले, तेव्हा त्यांनी आपले काम जबरदस्तरीत्या पार पाडले होते.
सामन्याची बात करायची तर ऑस्ट्रेलियाने आपला डावा 6 विकेट गमावून 532 धावांवर घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोन्स्टासने 109 आणि विकेटकीपर-बॅट्समन जोश फिलिपेने 123 धावांची शानदार फटकेवारी केली. उर्वरित 3 फलंदाजांनीही 70 प्लस धावा करून भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तरीही भारतीय फलंदाजांनीही कमाल केली आणि बातमी लिहिली जाण्यापर्यंत 7 विकेट गमावून 520 धावा केल्या आहेत. सध्या ते 12 धावांनी मागे आहेत. खेळाचा चौथा दिवस सुरू आहे आणि हा सामना आता ड्रा कडे झुकत आहे.
Comments are closed.