नक्षलीनेता बसवराजूसह 27 नक्षलवादी ठार

गडचिरोली सीमेपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात चकमकीत नक्षलीनेता नंबाला केशवराव ऊर्फ बसवराजू (70) याच्यासह 27 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा जिह्याच्या सीमा भागात ही चकमक झाली. यात एक सुरक्षा जवान शहीद झाला. चकमक स्थळावर शोधमोहीम सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाड व इंद्रावती राष्ट्रीय उद्यान जंगल परिसरात मोठय़ा संख्येने नक्षलवादी एकत्र आले होते. यात विविध राज्यात पाच कोटीहून अधिक बक्षीस असलेला नक्षलवादी चळवळीचा देशातील जहाल नक्षलवादी नेता आणि ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य नंबाला केशव रावदेखील असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर या परिसरात 20 मे रोजी रात्रीच्या सुमारास दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर आणि काsंडागाव जिह्यातील पाचशेहून अधिक ‘डीआरजी’ व इतर सुरक्षा जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवले.
कोण होता बसवराजू?
नंबाला केशवराव हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिह्यातील जियान्नापेट गावचा रहिवासी होता. त्याने वारंगल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱया प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक उत्तीर्ण केले होते. कॉलेज जीवनापासूनच तो डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेललेल्या नंबालाने ‘आयईडी’चा वापर यासारख्या लष्करी रणनीतीवर प्रभुत्व मिळवले होते. आंध्र प्रदेशात जेव्हा सीपीआय (एमएल) पीपल्स वॉरची स्थापना झाली तेव्हा तो प्रमुख संघटकांपैकी एक होता.
Comments are closed.