हार्दिक-संजू संघात असताना अक्षर पटेलला उपकर्णधार का बनवलं? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघ 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा शनिवारी रात्री करण्यात आली. या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली, ज्याचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघात परतला असून, अष्टपैलू अक्षर पटेलला मोठी जबाबदारी मिळाली आहे.

अष्टपैलू अक्षर पटेलला भारतीय संघाचं उपकर्णधारपद मिळालं आहे. संघात हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन सारखे खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत, जे आयपीएलमध्ये अनेक वर्षांपासून नेतृत्व करत आहेत. परंतु निवड समितीनं अक्षरवर भरवसा दाखवत त्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं. या लेखात आम्ही तुम्हाला अक्षर पटेलला भारताच्या टी20 संघाचा उपकर्णधार का बनवण्यात आलं याची 3 कारणं सांगणार आहोत.

(3) चेंडू आणि बॅटनं जबाबदारी घेण्यास सक्षम – टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं स्वतःला एक परिपक्व खेळाडू म्हणून सादर केलं आहे. गुजरातच्या या अष्टपैलू खेळाडूनं आतापर्यंत टीम इंडियासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. विशेष म्हणजे त्यानं फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत आपली छाप सोडली आहे. अक्षरला फलंदाजीत जबाबदारी कशी घ्यायची हे माहित आहे. तर गोलंदाजीद्वारे संघासाठी एक्स-फॅक्टरची भूमिका बजावण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे.

(2) दिल्ली कॅपिटल्समध्ये वाढता प्रभाव – अक्षर पटेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. गेल्या हंगामात रिषभ पंतच्या अनुपस्थितीत त्यानं दिल्लीचं नेतृत्व केलं होतं. यावेळी दिल्ली कॅपिटल्सनं त्याला मोठ्या किमतीत रिटेन केलं आहे. अशा परिस्थितीत त्याला संघाचं कर्णधारपदही मिळू शकतं. त्यामुळे आता त्याला टीम इंडियामध्येही जबाबदाऱ्या मिळू लागल्या आहेत.

(1) 2024 टी20 विश्वचषकात उत्तम कामगिरी – टीम इंडियानं गेल्या वर्षी टी20 विश्वचषक जिंकला. या विश्वचषकात अक्षर पटेलचं योगदान कोणत्याही प्रकारे नाकारता येणार नाही. त्यानं अंतिम सामन्यात 47 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय, अक्षरनं संपूर्ण विश्वचषकात 7 सामन्यांच्या 5 डावात 92 धावा काढण्यासोबतच 9 विकेट्सही घेतल्या होत्या.

हेही वाचा –

बीसीसीआयला नवे सचिव मिळाले, माजी खेळाडूने घेतली जय शाहंची जागा
“त्याला आणखी थोडा वेळ द्या”, दिग्गज खेळाडूनं केला गौतम गंभीरचा बचाव
महाराष्ट्राच्या लेकीनं इतिहास रचला, महिला क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!

Comments are closed.