मुंबई किनारपट्टीजवळ 3 संशयास्पद तेल टँकर जप्त

ओळख लपविण्यासाठी बदलले होते नाव : इराणशी संबंध असल्याचा संशय

वृत्तसंस्था/ मुंबई

भारताने चालू महिन्यात मुंबईच्या किनाऱ्यानजीक समुद्रात तीन तेल टँकर जप्त केले आहेत. या जहाजांचे आयएमओ क्रमांक अमेरिकेकडून प्रतिबंधित जहाजांशी जुळणारे आहेत आणि या टँकरचा इराणशी संबंध असल्याचा संशय आहे. परंतु इराणची नॅशनल इरानियन ऑइल कंपनीने या जहाजांशी कुठल्याही प्रकारचा संबंध  नाकारला आहे. या जहाजांची नावे स्टेलर रुबी, अस्फाल्ट स्टार आणि अल जफजिया अशी आहेत.

या टँकरना मुंबईच्या किनाऱ्यापासून जवळपास 100 सागरी मैल अंतरावर संशयास्पद हालचालींनंतर रोखण्यात आले होते. नंतर तपासणीसाठी या टँकरना मुंबई बंदरावर आणले गेले. हे टँकर स्वत:ची ओळख लपविण्यासाठी वारंवार स्वत:चे नाव, ध्वज आणि अन्य खुणा बदलत होते. या जहाजांची मालकी विदेशी कंपन्यांकडे आहे.

तटरक्षक दलाने वाढविली देखरेख

या घटनेनंतर तटरक्षक दलाने देखरेख आणखी वाढविली आहे. तटरक्षक दल पूर्णवेळ भारताच्या सागरी क्षेत्रात देखरेख करत आहे. याकरता सुमारे 55 जहाजे आणि 10-12 विमाने तैनात करण्यात आली आहेत. अल जफजिआने 2025 मध्ये इराणमधून जिबूतीपर्यंत कच्चे तेल पोहोचविले होते. तर स्टेलार रुबी इराणच्या ध्वजाच्या अंतर्गत नोंदणीकृत आहे. तर अस्फाल्ट स्टार मुख्यकरून चीनच्या आसपास सागरी मार्गांवर सक्रिय असते.

अमेरिकेकडून निर्बंध

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या ऑफिस ऑन फॉरेन असेट्स कंट्रोलने मागील वर्षी ग्लोबल पीस, चिल 1 आणि ग्लोरी स्टार 1 नावाच्या जहाजांवर बंदी घातली होती. त्यांचे आयएमओ क्रमांक मुंबईच्या किनाऱ्यानजीक जप्त टँकरशी मिळतेजुळते आहेत. याचमुळे हे टँकर बंदीचे उल्लंघन करत तेलव्यापारात सामील असल्याचा संशय आहे.

 

 

Comments are closed.