3 वर्षे कारावास, 3 लाख रुपये दंड

भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानींवर होणार मोठी कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. यानुसार भारतात असलेल्या पाकिस्तानी  नागरिकांना त्वरित देश सोडण्याचा निर्देश देण्यात आला होता. यानुसार काही पाकिस्तानी मायदेशी परतले आहेत. तर आणखी काही दिवस पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढले जाणार आहे. तर या नियमाचे पालन न करणाऱ्या पाकिस्तानींवर मोठी कारवाई केली जाऊ शकते. कुठलाही पाकिस्तानी नागरिक निर्धारित कालमर्यादेत भारतातून बाहेर न पडल्यास त्याला अटक करत खटला चालविला जाणा आहे. तसेच या पाकिस्तानी नागरिकाला 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा कमाल 3 लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षांना सामोरे जावे लागू शकते.

सार्क व्हिसा बाळगणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याची मुदत 26 एप्रिलपर्यंत होती, तर वैद्यकीय व्हिसा बाळगणाऱ्यांसाठी कालमर्यादा 29 एप्रिल आहे. तर 12 श्रेणींच्या व्हिसाधारकांसाठीची मुदत संपुष्टात आली आहे.

इमिग्रेशन आणि विदेशी अधिनियम 2025

4 एप्रिल रोजी लागू झालेल्या इमिग्रेशन आणि विदेशी अधिनियम 2025 नुसार निर्धारित मुदतीपेक्षा अधिक काळापर्यंत वास्तव्य, व्हिसा अटींचे उल्लंघन करणे किंवा प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अनुमतीशिवाय प्रवेश केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास  आणि 3 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. विदेशी असूनही व्हिसाअंतर्गत जारी करण्यात आलेल्या मुदतीपेक्षा अधिक काळ भारतात वास्तव्य केल्यास किंवा व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्यास ही शिक्षा सुनावली जाते.

गृहमंत्र्यांचा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कुठलाही पाकिस्तानी नागरिक निर्धारित कालमर्यादेपेक्षा अधिक काळ भारतात राहू नये हे सुनिश्चित करण्याचा निर्देश दिला आहे. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेत व्हिसा रद्द करण्यात आलेले पाकिस्तानी नागरिक संबंधित कालमर्यादेत भारत सोडतील हे सुनिश्चित करण्यास सांगितले होते.

Comments are closed.