IPL 2025: विराट कोहलीचा 'विराट विक्रम' मोडणार हे 3 युवा खेळाडू?
18व्या आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. पहिलाच सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होईल. दरम्यान दोन्ही संघ ईडन गार्डन्स मैदानावर आमने-सामने येतील. तत्पूर्वी दिग्गज विराट कोहलीने (Virat Kohli) आजपर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकले नसेल, परंतु, या अनुभवी फलंदाजाच्या नावावर अनेक विक्रम आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम.
विराटने 2016च्या आयपीएल हंगामात 973 धावा केल्या आणि त्याच्या संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यास मोलाची भूमिका बजावली. पण त्यांना फायनलमध्ये ट्राॅफी उंचावण्यात यश आले नाही. तेव्हापासून, त्यांनी आणखी 8 हंगाम खेळले गेले आहेत, परंतु अद्याप कोणीही किंग कोहलीचा विक्रम मोडू शकलेले नाही. या बातमीद्वारे आपण अशा 3 युवा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, जे आयपीएल 2025 मध्ये विराटचा एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडू शकतात.
१) अभिषेक शर्मा- शेवटच्या हंगामात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) फलंदाजीने कहर केला. त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अभिषेकच्या धमाकेदार कामगिरीमुळे संघ फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला. त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. अलिकडेच इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत अभिषेकने शानदार फलंदाजी केली आणि 54 चेंडूत नाबाद 135 धावा केल्या. आयपीएलमध्ये अभिषेकचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो कोहलीची विक्रम मोडीत काढू शकतो.
2) शुबमन गिल- या यादीत गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलचाही (Shubman Gill) समावेश आहे. त्याने गेल्या 6 वनडे सामन्यांमध्ये 3 शतके झळकावली आहेत. तो बऱ्याच काळापासून सातत्याने धावा करत आहे. गिल गुजरातसाठी सलामीला येतो, त्यामुळे त्याचा फॉर्म पाहता तो आयपीएलमध्ये विराटचा विक्रम मोडू शकतो.
3) रचिन रवींद्र- न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. रचिन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानावर होता.त्याच्याकडे जलद गतीने धावा काढण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत, जर रचिन आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवण्यात यशस्वी झाला तर तो विराटचा विक्रम मोडू शकतो.
Comments are closed.