300 प्रवाशांनी भरलेले जहाज पेटले! इंडोनेशियाच्या समुद्रात अग्निकल्लोळ, लोकांनी पाण्यात उड्या टाकल्या

इंडोनेशियाच्या समुद्रात भयंकर अपघात झाला आहे. येथील सुलावेसी किनाऱ्यावर 300 लोकांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग लागली. आगीमुळे घाबरून जाऊन जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी समुद्रात उड्या टाकल्या. यात 18 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
बार्सिलोना नावाच्या जहाजावर सुमारे 300 प्रवासी होते. त्यात काही लहान मुलांचाही समावेश होता. काही कळण्याच्या आत दीड वाजण्याच्या सुमारास आगीचे लोळ उठले. जहाजाला आग लागल्याचे समजताच एकच धावपळ, आरडाओरड झाली. लोक सैरावैरा धावू लागले. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. बचावाचा मार्ग सापडत नसल्याने शेवटी लोकांनी पाण्यात उड्या टाकल्या. जहाजाला आग लागल्याचे कळताच जवळच असलेले मच्छीमार मदतीला धावले, मात्र प्रवाशांची संख्या जास्त असल्याने मदत तोकडी पडली. काही लोकांनी मच्छीमारांच्या बोटींचा आसरा घेऊन किनारा गाठला.
Comments are closed.