श्रीलंकेच्या नेव्हीने 32 भारतीय मच्छिमारांना अटक केली

विशेष कारवाईदरम्यान पाच बोटीही जप्त

वृत्तसंस्था/ चेन्नई

श्रीलंकेच्या नौदल अधिकाऱ्यांनी रविवारी समुद्री हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या 32 भारतीय मच्छिमारांना अटक केली. त्यांनी सदर मच्छिमारांच्या पाच मासेमारी बोटीही जप्त केल्या आहेत. मन्नारच्या उत्तरेकडील समुद्री भागात एका विशेष कारवाईदरम्यान त्यांना अटक करण्यात आल्याचे श्रीलंकेच्या नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे.

अटक केलेल्या मच्छिमारांना आणि त्यांच्या बोटींना तलाईमन्नार घाटावर नेण्यात आले आहे. तेथे त्यांना कायदेशीर कारवाईसाठी मन्नार मत्स्यव्यवसाय निरीक्षकांकडे सोपवण्यात आले. निवेदनानुसार, यावर्षी आतापर्यंत नौदलाने 131 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. या कालावधीत, श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या 18 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.

भारत आणि श्रीलंकेमध्ये मच्छिमारांचा प्रश्न हा वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. श्रीलंकेच्या समुद्रात बेकायदेशीर प्रवेश केल्याच्या अनेक कथित घटनांमध्ये श्रीलंकेच्या नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी पाल्क सामुद्रधुनी भागात भारतीय मच्छिमारांवर गोळीबार करत त्यांच्या बोटी जप्त केल्या आहेत.

Comments are closed.