33 चेंगराचेंगरी मध्ये ठार
तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीतील घटना : जवळपास 100 जण जखमी
मंडळे/ करूर
तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत शनिवारी संध्याकाळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 33 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रमण्यम यांनी सांगितले. या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. अभिनेता-राजकारणी विजय यांचा पक्ष ‘तामिळनाडू वेट्टी कझगम’च्या (टीव्हीके) रॅलीसाठी मोठ्या संख्येने चाहते व समर्थक जमल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मंत्री आणि अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे.
प्रसिद्ध अभिनेता आणि टीव्हीके प्रमुख विजय यांच्या करूर येथील रॅलील चेंगराचेंगरीमुळे गालबोट लागले. ऐन नवरात्रोत्सवात घडलेल्या या मोठ्या जीवितहानीमुळे उत्साहावर विरजण पडले आहे. अभिनेता विजयच्या सभेसाठी जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. रात्री 10 वाजेपर्यंत 33 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मृतांमध्ये सहा मुले आणि सहा महिलांचा समावेश होता. या दुर्घटनेत जखमी झालेल्या जवळपास 100 जणांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेदरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या विजय यांनी परिस्थिती पाहून लगेच आपले भाषण थांबवले आणि स्टेजवरून पाण्याच्या बाटल्या गर्दीत फेकून मदत करण्याचा प्रयत्न केला.
लाठीचार्जनंतर चेंगराचेंगरी
विजय यांच्या भाषणादरम्यान गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि अनेक कार्यकर्ते आणि समर्थक बेशुद्ध पडले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून विजय यांनी आपले भाषण थांबवले आणि शांततेचे आवाहन केले. त्यानंतर ते निघून गेले. अभिनेता विजयच्या रॅलीत जमलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे बचावासाठी लोकांची धावपळ सुरू झाल्यानंतर या घटनेला गंभीर स्वरुप प्राप्त झाले. प्रचंड गर्दीमुळे रुग्णवाहिकांना गर्दीतून मार्ग काढण्यात मोठी अडचण येत होती.
मुख्यमंत्र्यांकडून तातडीने दखल
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घटनेची दखल घेतली असून मंत्री आणि अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवत मदतकार्य राबविण्याच्या सूचना केल्या. त्यांनी माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, आरोग्यमंत्री सुब्रमण्यम आणि जिल्हाधिक्रायांना बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना त्वरित वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. स्टॅलिन रविवारी घटनास्थळी भेट देण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी तिरुचिरापल्लीचे मंत्री अनबिल महेश यांनाही मदतकार्यात सर्वतोपरी मदत करण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी एडीजीपींना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित कारवाई करण्यास सांगितले. त्यांनी जनतेला डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
विरोधी पक्षनेत्यांचेही ट्विट
तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि एआयएडीएमकेचे सरचिटणीस एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांनी करूर येथे विजय यांच्या पक्षाच्या टीव्हीकेच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्विटरवर यासंबंधीची माहिती देताना विजय यांच्या रॅलीतील चेंगराचेंगरीत 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि या दु:खद घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.
मुलीला शोधण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर चेंगराचेंगरी?
रॅलीमध्ये सहभागी झालेली एक 9 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर अभिनेता विजयने स्टेजवरून पोलीस आणि त्याच्या समर्थकांना तिला शोधण्यासाठी आवाहन केले. या आवाहनानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे. गर्दीत अडकल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. याताच अनेक लोक आणि कार्यकर्ते बेशुद्ध होऊ लागले. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून विजयने आपले भाषण थांबवले आणि लोकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर तो भाषण सोडून निघून गेल्याचे समजते.
वारंवार घटना, तरीही दुर्लक्ष
प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याच्या दुर्घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. अलिकडेच बेंगळूरमध्ये आयपीएलमधील आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बेंगळूरमध्ये विजयी रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाखो लोक उपस्थित होते. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करताना चेंगराचेंगरी झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 50 हून अधिक जण जखमी झाले होते. मात्र, अशा दुर्घटनांनंतरही सावधगिरीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना वारंवार होताना दिसत आहेत.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तामिळनाडूच्या करूर जिह्यात चेंगराचेंगरीसारख्या दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानीने मन व्यथित झाले आहे. मी शोकाकुल कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करते, असे ट्विट राष्ट्रपतींनी केले आहे. पंतप्रधानांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त करताना ‘निष्पाप जीव गमावणे खरोखरच हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांना माझ्या मनापासून संवेदना. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो’, असे स्पष्ट केले.
Comments are closed.