नाकेबंदी असूनही होर्मुझ येथून 34 जहाजे निघाली

भारतीय तेल, एलपीजी टँकर्सना मिळणार नवा मार्ग

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेने इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत 13 एप्रिलपासून नाकाबंदी केली आहे. इराणने त्यापूर्वीच हा मार्ग रोखला आहे. परंतु अमेरिकेच्या कठोर पहाऱ्यानंतरही होर्मुझ सामुद्रधुनीतून कमीतकमी 34 व्यापारी जहाजं रवाना झाली आहेत. भारत सरकारच्या अंतरिम अधिकृत माहितीनुसार होर्मुझ संकटामुळे अद्याप 14 भारतीय जहाज पर्शियन उपसागरात नांगर टाकून आहेत. दोन महिन्यानंतरही त्यांना तेथून बाहेर पडण्याचा मार्ग दिसलेला नाही. तर काही दिवसांपूर्वी दोन भारतीय जहाजांनी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु इराणच्या इशाऱ्यामुळे त्यांना परतावे लागले होते. पण नवी माहिती समोर आल्यावर भारतीय तेल आणि एलपीजी टँकर्ससाठी पर्यायी मार्गाची आशा वाढली आहे.

इराणशी लिंक असलेली कमीतकमी 34 टँकर्स अमेरिकेची नाकाबंदी सुरू झाल्यावरही होर्मुझमधून बाहेर पडली आहेत. जहाजं इराणच्या समुद्रातून अमेरिकेच्या नाकाबंदी क्षेत्रात न पोहोचता, तसेच पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात प्रवेश न करता मकरानच्या किनारी क्षेत्रातून येऊ शकतात. अशा जहाजांना अमेरिकच्या नौदलाची नजर असलेल्या आंतरराष्ट्रीय जलमार्गात जाण्याची गरज भासत नाही.

चाबहार बंदराचाही पर्याय

अमेरिकेचे नौदल सामान्य स्थितीत कुठल्याही अन्य देशाच्या सागरी क्षेत्रात असलेल्या जहाजांना रोखू शकत नसल्याने हा नवा पर्याय समोर आला आहे.

-भारतात येण्यासाठी एक दुसरा संभाव्य मार्ग आहे. जहाजं इराणच्या किनारी क्षेत्रातून चाबहार बंदरात मग दक्षिणेकडे वळून आंतरराष्ट्रीय समुद्रात दाखल होऊ शकतात.

-तेथून ही तेलवाहू किंवा गॅसवाहू जहाजं थेट महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक किंवा केरळमधील बंदरांच्या दिशेने रवाना होऊ शकतात.

अमेरिकेच्या नाकाबंदीच्या निर्धारित सीमा

-अमेरिकेची नाकाबंदी सध्या केवळ इराणसोबत जारी संघर्षामुळे तेथील आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रापर्यंत लागू आहे.

-आंतरराष्ट्रीय जलमार्गातून जाणाऱ्या आणि  अवैध कारवायांमध्ये सामील नसलेल्या जहाजांना अमेरिकेचे नौदल रोखू शकत नाही.

पाकिस्तानी सागरी क्षेत्राला टाळता येणार

पाकिस्तानच्या मार्गे भारतीय जहाजांचे येणे शक्य असले तरीही हे जोखिमीचे असू शकते. भारतीय जहाजांना भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सुरक्षेत आणले जात आहे, याचमुळे त्यांना पाकिस्तानी किनाऱ्यानजीक किंवा पाकिस्तानी जलक्षेत्रात प्रवेश करण्याची अनुमती नाही अशी माहिती नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याने दिली आहे. ओमानच्या उपसागरातून ही जहाजं थेट भारतीय बंदरांच्या दिशेने प्रवास करू शकतात.

Comments are closed.