उपवासाच्या पिठातून 35 जणांना विषबाधा; वडूजमधील घटना
सध्या नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात सुरू आहे. या काळात बहुतांशी महिला तसेच काहीअंशी पुरुष उपवास करतात. उपवासाच्या रेडीमेड भाजणी पिठाच्या भाकरी खाल्ल्याने वडूज परिसरातील सुमारे 35 जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी अनेक रुग्णांवर वडूज येथील डॉ. बी. जे. काटकर हॉस्पिटल तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य काही खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारपासून हा प्रकार सुरू झाला होता. रेडीमेड भाजणी पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांशी रुग्णांना चक्कर येणे, मळमळ होणे, हातपाय थरथर कापणे, तर काही रुग्णांना उलटय़ा, जुलाबाचा त्रास होऊ लागला.
मीना खाडे, शोभा खाडे, सुवर्णा डोईफोडे, सीमा यादव, वंदना पाटील, मारुती फडतरे, सागर फडतरे, मीना राऊत, सीमा यादव, अर्चना खाडे, लक्ष्मण खाडे, मनीषा जाधव, सुनीता पाटील, अलका फडतरे, सुभद्रा खरात (सर्व रा. मांडवे), सुभद्रा गुरव (रा. किरकसाल), शांता शरद पवार, सुवर्णा पवार (दोघी रा. उंबर्डे), केदार तोडकर, संजीवनी तोडकर, अश्विनी तोडकर, जयश्री लोहार (सर्व रा. वडूज), गंगाबाई निंबाळकर, शोभा घार्गे (रा. पळशी), लता खाडे, रंजना खाडे (दोघी रा. तडवळे), जयश्री शेटे (रा. कोकराळे), अंजना जाधव, ऋतुजा जाधव गुरसाळे, संगीता गुरव बनपुरी, माया फडतरे (सर्व रा. वाकेश्वर), वैशाली गलंडे (रा. बोंबाळे), आक्काताई मदने, रेखा हिरवे (रा. गुरसाळे) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. यापैकी 17 रुग्णांवर डॉ. काटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये, 3 रुग्णांवर वडूज ग्रामीण रुग्णालयात, 7 रुग्णांवर डॉ. मोरे यांच्या सदिच्छा क्लिनिकमध्ये, तर डॉ. शुभांगी काटकर यांच्या दवाखान्यात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकारी
डॉ. युनूस शेख, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लीला मदने हे दोघे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. यापैकी अनेक रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, काहींना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
पोलीस ‘वेट ऍण्ड वॉच’च्या भूमिकेत
याप्रकरणी अद्यापि कोणत्याही रुग्णाने पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिलेली नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये समक्ष जाऊन रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दुकानातून भाजणी पीठ खरेदी केले, त्या वैभव ट्रेडर्स, अरिहंत ट्रेडर्स, साई बाजार या तीन मालकांना समजपत्र काढण्याबरोबरच अन्न व भेसळ विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याचबरोबर डॉ. काटकर हॉस्पिटलकडून एमएलसी प्राप्त होताच, दोषी दुकानदारांविरोधात गुन्हा नोंद करणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
Comments are closed.