देवभूमीत साकारलं देशातील सर्वोत्तम वेलोड्रम

>>विठ्ठल देवकाते

ऋषीमुनींची भूमी असलेल्या उत्तराखंडला देवभूमी म्हणून संबोधतात. याच देवभूमीतील रुद्रपूर येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने देशातील सर्वोत्तम सायकलिंग वेलोड्रम साकारलाय. क्रीडा संस्कृती फारशी न रुजलेल्या उत्तराखंडसाठी हा सायकलिंग वेलोड्रम म्हणजे क्रीडा क्षेत्रातील एक मंदिरच ठरणार आहे. कारण या ठिकाणी येत्या काही महिन्यांत राष्ट्रीय सायकलिंग अॅपॅडमी साकारण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने रुद्रपूर येथे 333.33 मीटरचा अंतरराष्ट्रीय दर्जाचा अत्याधुनिक वेलोड्रम तयार करण्यात आलाय. रुद्रपूरमधील नैसर्गिक आल्हाददायक वातावरण, येथील प्रशस्त आणि दर्जेदार रस्ते, खेळाडूंसाठी निवासाची सुविधा या सर्व अत्याधुनिक गोष्टी येथे तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तराखंडमधील या देवभूमीत सायकलिंगच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

‘एक दशकापासून महाराष्ट्रातील पुण्याचीदेखील क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे, मात्र संधी असूनही पुण्यात ट्रक सायकलिंगसाठीचा वेलोड्रम उभा राहू शकला नाही. राज्य शासनाची उदासीनता आणि क्रीडा संचालनालयाचा असहकार याला कारणीभूत आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागतेय. पुण्यात 1994 साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने बालेवाडी क्रीडानगरीत सायकलिंग वेलोड्रम बनविण्यात आला होता, मात्र व्यवस्थित काळजी न घेतल्याने त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाली. त्या वेलोड्रमची काळजी घेतली असती आणि वेळोवेळी डागडुजी करण्यात आली असती तर आज पुणे ट्रक सायकलिंगचे माहेरघर बनले असते. आता उत्तराखंडमधील रुद्रपूरला ट्रक व रोड सायकलिंगचे माहेरघर बनण्याची संधी चालून आली आहे. या संधीचे उत्तराखंड सायकलिंग असोसिएशनने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मदतीने सोने करावे.’

प्रॅटाप जाधव, उपाध्यक्ष, हिंदुस्थान सायकलिंग महासंघ (सीएफआय)

Comments are closed.