जोगेश्वरीत चार कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने जोगेश्वरीत धडक कारवाई केली. एमडी ड्रग्ज विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा ड्रग्ज तस्करांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून चार कोटी किमतीचा दोन किलो एमडी साठा जप्त करण्यात आला. जोगेश्वरी पश्चिमेकडील बस डेपो नजीकच्या बस स्टॉपवर दोन ड्रग्ज तस्कर एमडीचा साठा विक्रीसाठी आणणार असल्याची खबर वरिष्ठ अधिकाऱयांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-5चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांनी सपोनि चौधरी, उपनिरीक्षक बेंडाळे, न्यायनिर्गुणे तसेच तानाजी पाटील, अविनाश चिलप, इक्बाल सिंग, वायंगणकर व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून मिळालेल्या दोघा ड्रग्ज तस्करांवर झडप घातली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात दोन किलो एमडीचा साठा मिळून आला. त्या ड्रग्जची किंमत चार कोटी इतकी असल्याचे सांगण्यात येते. हा एमडी त्यांनी कुठून आणला होता व ते कोणाला विकणार होते याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments are closed.