आमदारांच्या व्हीआयपी तिकिटांमुळे ललित मोदी संतापले; म्हणाले, “त्यांना विशेष अधिकार का?”
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम आजपासून (शनिवार, २८ मार्च) सुरू होत आहे. या स्पर्धेतील सामन्यांचे प्रत्येक आमदाराला चार व्हीआयपी तिकिटे देण्याच्या निर्णयावर माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा आदेश कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या प्रत्येक सामन्याबाबत दिला आहे.
सर्वपक्षिय सदस्यांना केवळ एकच तिकिट दिले जात होते. काही प्रकरणांमध्ये सामन्या आसनव्यवस्थेत प्रवेश दिला जात असल्याची तक्रार केल्यानंतर वरील आदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच काही आमदारांनी स्टेडियमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष असावा, याचीही मागणी केली. याच मागण्यांवर मोदी भडकले आहेत.
व्हीआयपी तिकिटांबाबत कॉंग्रेसचे आमदार काशप्पनवर विजयानंद शिवशंकरप्पा म्हणाले, “पास मिळण्यास पात्र असूनही लोकप्रतिनिधींना रांगेत उभे राहण्यास, तिकिटे खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. आम्ही सामन्य जनतेप्रमाणे रांगेत उभे राहू शकत नाही. मागील वेळी आम्हाला रांगेत उभे करून नंतर सामान्य गॅलरीमध्ये पाठवले गेले. तसेच ऑनलाईन मार्गाने आणि मधस्थांकडून ५००० रुपयांच्या किंमतीची तिकिटे पुन्हा ३५,००० ला विकली जात आहेत.”
व्हीआयपी तिकिटांबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली असून त्यामध्ये हर्ष गोयंका यांच्या ट्वीटला उत्तर देत मोदी म्हणाले, “हा निव्वळ मुर्खपणा आहे. त्यांना हे विशेष अधिकार का. आयपीएल चाहत्यांनी बनवली आहे, निवडून आलेल्या प्रतिनिधींनी नाही. तरीही त्यांना ते आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे वाटते. अलिकडेच एका आशियाई देशात एका महत्वाच्या क्रीडा स्पर्धेच्या आयोजकाकडून दोन तिकिटे मोफत घेतल्याबद्दल एका मंत्र्याला पदावरून काढून टाकले होते.”
पहिल्या दिवशी आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार असून सामन्याआधीचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. ४ जून २०२५ मध्ये आरसीबीच्या पहिल्या विजयोत्सवावेळी या स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामाची ओपनिंग सेरेमनी रद्द केली आहे.
Comments are closed.