आरसीबीच्या सराव सामन्यात 5 फलंदाजांची फटकेबाजी; विराट कोहलीची बॅटही तळपली, केल्या ‘इतक्या’ धावा

आयपीएल २०२६ चा थरार २८ मार्चपासून सुरू होत आहे आणि सर्व १० संघ जोरदार तयारी करत आहेत. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरेल आणि आपले जेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. त्याआधी रविवार, २२ मार्च रोजी आरसीबीच्या संघाने आपापसातच एक सराव सामना (इंट्रा-स्क्वॉड मॅच) खेळला. या सराव सामन्यात दोन संघ बनवण्यात आले होते, ज्यामध्ये एक संघ कृणाल पांड्या (टीम कृणाल) आणि दुसरा व्यंकटेश अय्यर (टीम वेंकी) यांचा होता. अय्यरच्या संघात जितेश शर्मा, टिम डेव्हिड, विराट कोहली यांसारखे खेळाडू होते, तर कृणालच्या संघात देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार यांसारख्या खेळाडूंचा समावेश होता.
RCB चा हा सराव सामना अत्यंत रोमांचक झाला, ज्यामध्ये दोन्ही संघांच्या फलंदाजांनी भरपूर धावा कुटल्या आणि ‘टीम कृणाल’ने १३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम कृणालने ४ बाद २४७ धावांचा डोंगर उभारला, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम वेंकी ७ बाद २३४ धावांपर्यंतच पोहोचू शकली. या सामन्यात टीम कृणालकडून देवदत्त पडिक्कल (६३ धावा), कर्णधार कृणाल पांड्या (५८ धावा) आणि रजत पाटीदार (७४ धावा) यांनी अर्धशतके झळकावली. दुसरीकडे, टीम वेंकीसाठी जितेश शर्माने ३७ चेंडूंत ८१ धावा कुटल्या. याशिवाय, टिम डेव्हिडने १४ चेंडूत ३६ धावा आणि कर्णधार व्यंकटेशने १६ चेंडूत ३० धावांची वादळी खेळी केली, तर कोहलीच्या बॅटमधून ८ चौकारांच्या मदतीने २९ धावा निघाल्या.
Comments are closed.