जेएनपीए बंदरात 5 हजार कंटेनर्स अडकले, शिपिंग कंपन्या आर्थिक संकटात; अमेरिका-इराण युद्ध लांबले तर नाशवंत माल सडण्याची भीती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रातिनिधीक छायाचित्र

आखाती युद्धाचा फटका हिंदुस्थानला बसला असून होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जेएनपीए बंदरात पाच हजार कंटेनर्स अडकून पडले आहेत. त्यात रिफर कंटेनर्सचाही समावेश असून अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध लांबले तर शिपिंग कंपन्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. युद्धामुळे निर्यात ठप्प झाली असून शेतकरी व व्यापाऱ्यांनादेखील मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या पाच दिवसांपासून घमासान युद्ध सुरू आहे. आखाती देशांमध्ये जाणारी सर्व मालवाहू जहाजे अडकून पडली असून जेएनपीए बंदरात तर द्राक्ष, कांदा, केळी, भाजीपालांचे कंटेनर्सही तसेच उभे आहेत. आखाती युद्धातील प्रत्येक घडामोडींवर जेएनपीएच्या अधिकाऱ्यांचे लक्ष असून अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी तसेच जेएनपीए बंदर परिसरात स्टपिंग सुविधा व विस्तारित स्टोरेजदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने त्याचा शिपिंग पंपन्यांवर परिणाम झाला असल्याची माहिती कंटेनर शिपिंग लाईन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील वासवानी यांनी दिली.

रमझानमुळे मागणी वाढली होती, पण…

हिंदुस्थानातून मोठय़ा प्रमाणावर फळे आणि भाज्या आखाती देशांत निर्यात केल्या जातात. सध्या रमजान महिना सुरू असल्याने मागणी वाढली होती. त्यामुळे जास्तीत जास्त मालाच्या निर्यातीचे नियोजन करण्यात आले होते. युद्धामुळे ते सगळेच अडकले आहे.

शहापूर तालुक्यातील शेतकरीही हवालदिल

आखाती युद्धामुळे शहापूर तालुक्यातील शेतकरीही हवालदिल झाले आहेत. या भागातील भेंडी, कारले, काकडी, ढोबळी मिरची आखाती राष्ट्रांमध्ये निर्यात केली जाते, पण सध्या निर्यात बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

Comments are closed.