धक्कादायक… डोंबिवली एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये कोसळून वृद्धाचा मृत्यू; प्रशासनाच्या निगरगट्ट कारभाराचा बळी कल्याण, डोंबिवलीमध्ये संताप

डोंबिवलीत अर्धवट विकासकामे आणि खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातच आता नागरी सोयीसुविधांचाही बोजवारा उडाला असून एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये कोसळून एका वृद्धाचा हकनाक मृत्यू झाला आहे. बाबू चव्हाण (60) असे मृताचे नाव आहे. महापालिका आणि एमआयडीसीमध्ये समन्वय नसल्यामुळेच प्रशासनाच्या निगरगट्ट कारभाराचा हा बळी असल्याचा संताप कल्याण, डोंबिवलीत व्यक्त होत आहे. कल्याण पूर्वेकडील टाटा पॉवर नाका परिसरात आज दुपारी ही घटना घडली

बाबू चव्हाण हे टाटा पॉवर नाका परिसरातून पायी घरी जात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते रस्त्यालगत असलेल्या एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडले. चेंबरमध्ये कोसळताच त्यांच्या डोक्याला पाण्याच्या लोखंडी व्हॉल्वचा फटका बसला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना तातडीने चेंबरमधून बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेतील चव्हाण यांना डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा, मगच मृतदेह ताब्यात घेऊ
बाबू चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे समजताच हॉस्पिटल परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संतप्त नागरिकांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केले.

झाकण बसवण्याकडे दुर्लक्ष
धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणचे चेंबर कित्येक दिवसांपासून उघडेच आहे. धोकादायक चेंबर झाकण लावून बंदिस्त करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी पालिका आणि एमआयडीसी प्रशासनाकडे केली होती. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर या उघड्या चेंबरने बाबू चव्हाण यांचा बळी घेतला. एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे वडील हकनाक जीवानिशी गेले, असा आरोप त्यांची मुले काशिनाथ आणि प्रवीण यांनी केला.

Comments are closed.