बिहारमधील मतदार यादीतून 65 लाख नावे वगळली गेली

निवडणूक आयोगाकडून प्राथमिक डेटा जारी : 7.24 कोटी मतदारांचा समावेश

वृत्तसंस्था/ पाटणा

निवडणूक आयोगाने बिहारमधील मतदारयादीच्या विशेष फेरसर्वेक्षणाच्या (एसआयआर) पहिल्या टप्प्याचा अंतिम डेटा जारी केला आहे. या टप्प्यांतर्गत 7.24 कोटी मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असून 65 लाख नावे वगळण्यात आली आहेत. काढून टाकलेल्या नावांमध्ये मृत, विस्थापित, परदेशात स्थायिक किंवा कायमचे बिहारबाहेर स्थलांतरित झालेल्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षणानुसार काढून टाकलेल्या 65 लाख नावांपैकी 22 लाख मृत, 36 लाख विस्थापित आणि 7 लाख मतदार कायमचे स्थलांतरित झाले आहेत.

मतदार यादीतून बनावट, डुप्लिकेट किंवा अपात्र नावे काढून टाकणे आणि नवीन पात्र मतदार जोडणे या उद्देशाने 24 जून 2025 रोजी ‘एसआयआर’ ही मोहीम सुरू करण्यात आली होती. 38 जिह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी, 243 ईआरओ, 2976 सहाय्यक ईआरओ आणि 77,895 बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) यांनी ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासोबतच राज्यातील 12 प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असलेल्या 1.60 लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट्स (बीएलए) यांचाही सहभाग दिसून आला.

आता निवडणूक आयोग 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मोहीम राबविणार आहे. या कालावधीत ज्यांची नावे चुकून वगळण्यात आली आहेत किंवा ज्यांना आतापर्यंत समाविष्ट करण्यात आले नसलेले मतदार यादीत आपली नावे समाविष्ट करू शकतात. याशिवाय, ज्यांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणीकृत आहेत त्यांना फक्त एकाच ठिकाणी समाविष्ट केले जाणार आहे.

Comments are closed.